कळवण : जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर महिला मतदारांची झालेली गर्दी, तर दुसर्या छायाचित्रात सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले दांपत्य. (छाया : बापू देवरे)
Published on
:
21 Nov 2024, 10:14 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:14 am
कळवण: कळवण-सुरगाणा या आदिवासी विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. बुधवार (दि.20) सकाळी सात वाजल्यापासून दिवसभरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 टक्के मतदान झाले असून यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने निवडणूक निकालाबाबत ही उत्सुकता निर्माण झाली.
बुधवार (दि.20) सकाळी 7 ते 9 या कालावधीत 8.91 टक्के, तर 11 वाजेपर्यंत 18.24 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. दुपारी एक वाजता ही टक्केवारी 36.15 झाली. तर तीन वाजेला 55.81 टक्के तर बुधवार (दि.20) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 70.07 टक्के झाले होते. टक्केवारीच्या वाढीमुळे विजयाचा दावा प्रमुख दोन्ही उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार व माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी ही केला आहे.
कळवण व सुरगाणा तालुक्यातील एकूण 2 लाख 98 हजार 158 मतदारांना मतदान करण्याची संधी होती. त्यापैकी 348 मतदान केंद्रावर सहा वाजेपर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान हक्क बजावला. दिवसभरात विविध केंद्रांवर प्रमुख उमेदवारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
यंदा आदिवासी पट्ट्यात जोरदार मतदान झाले. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. गावित यांनी गेल्यावर्षी आदिवासी भरतीबाबत आंदोलन घडविल्याने आदिवासी युवक यावेळी मोठया प्रमाणात मतदानाला दिसला. आदिवासी तरुणी आणि महिला यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती.
सकाळी सात वाजता मतदानाता हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले दांपत्य. (छाया : बापू देवरे)
माजी सभापतीवर गुन्हा दाखल
कळवण पंचायत समितीचे माजी सभापती विजय शिरसाठ यांना मीडिया सेल 117 या सोशल मीडिया ग्रुपवर आलेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार यांच्या प्रचारार्थ कनाशी गावातील मंदिरात लोकांची सभा घेऊन पैसे वाटप करताना व पवारांना मतदान करण्याचा उल्लेख आढळला. म्हणून लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कळवण - सुरगाणा मतदार संघातील अभोणा मतदान केंद्रात ४११५ पैकी २८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६९.९६ टक्के मतदान झाले. काही कार्यकर्त्यांमधील किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडले. लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत घटल्याचे दिसून आले. काही मतदार बाहेर गावी गेल्याने अन् काहींचे मतदार यादीत नावे न सापडल्याने त्यांना मतदानापासून दूर रहावे लागले.