Published on
:
21 Nov 2024, 10:01 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:01 am
दिंडोरी: दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केले ,५ वाजेपर्यंत ७१.९७ टक्के मतदान झाले असून महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ व महाविकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनीता चारोस्कर यांच्यात चुरस दिसुन आली असून तेरा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. युती व आघाडीचे कार्यकर्ते आकडेमोड करत आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा करत आहे.
दिंडोरी : गोंडेगाव येथे आईसोबत मतदान करताना खासदार भास्कर भगरे,(छाया : अशोक निकम)
राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांनी वनारे येथे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांनी पांडे, तर खासदार भास्कर भगरे यांनी गोंडेगाव येथे मतदान केले. दोन्ही उमेदवारांनी मतदार आपल्यालाच निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला. दिंडोरी, वणी व पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दिंडोरी : वनारेत सपत्नीक मतदान करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. (छाया : अशोक निकम)
पेठ व दिंडोरीच्या पश्चिम भागातील रोजगारासाठी बाहेर गेलेले मतदार मतदानासाठी आले होते. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी येथील व्हि एन नाईक महाविद्यालयात सखी केंद्र आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले, येथील सेल्फी पॉइंटवर मतदारांनी मतदान झाल्यावर सेल्फी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.
वणी : मतदानाचा हक्क बजावलेले 92 वर्षांचे शांतीलाल कटारिया,(छाया : अशोक निकम)
दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३७२ मतदानकेंद्रावर सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या, बुधवार (दि.20) दुपारपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यकर्ते मतदारांची ने आण करत आपल्याच उमेदवारास मतदान करण्यासाठी साद घालत होते. दुपारी काही वेळ मतदानाचा वेग मंदावला मात्र तीन नंतर मतदानास वेग आला. अनेक मतदान केंद्रावर ६ पर्यंत मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदान केंद्रावर ६ वाजेनंतरही मतदान सुरू होते.
वणी : दिंडोरी विधानसभा निवडणुकीत वणी शहरात ६६.२५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. वणी शहरात व परिसरात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ९५ वर्षांच्या वृध्दांनी मतदानाचा हक्क बजावला. गत निवडणुकीपेक्षा तीन टक्क्यांनी मतदान घसरले. सकाळी ७ ते ११ दरम्यान २२ टक्के मतदान झाले. तसेच अगदी प्रतिष्ठेची लढत दिंडोरी मतदारसंघात आहे. प्रामुख्याने विधानसभा उपाध्यक्ष विरोधात माजी आमदार पत्नी अशी अत्यंत चुरशीची लढाई आहे. स्टार प्रचारकांच्या सभा घेत निवडणूक प्रतिष्ठेची केली. शहरात एकूण १२,८५२ मतदार असून ८,५१५ यांनी आज लोकांनी मतदानाचा हक्क बजावला