कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशीरा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. Pudhari
Published on
:
27 Jan 2025, 5:58 am
Updated on
:
27 Jan 2025, 5:58 am
पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच कांद्याला चांगला भाव मिळत नाही म्हणून त्रस्त आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढत जाणारा औषधांचा व खतांचा खर्च व मिळणारं उत्पन्न पाहाता त्यात काही ताळमेळ लागत नाही. अशातच शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. तणनाशक फवारणीमुळे देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावरील पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
इंडियन पेस्टीसाइड्स लिमिटेड कंपनीच्या ‘क्लोगोल्ड’ या तणनाशकामुळे हे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शंभर एकर कांद्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच कृषिमंत्री रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सूचना केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी देवळा तालुक्यात विठेवाडी परिसरात तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान झाले होते. पुन्हा तोच प्रकार मेशी परिसरात घडला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांना हा प्रकार समजल्यावर रात्री उशिरा त्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी केली. मंत्री कोकाटे यांनी संबंधित तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सक्त सूचना दिल्या. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्याचे निर्देश दिले. नुकसान ही संबंधित कंपनीच्या तणनाशक उत्पादनातील चुकांमुळे झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांनी कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली. त्यातच आता बांग्लादेश सरकारने कांद्यावर 10 टक्के आयात शुल्क लादल्याने देशातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.