नाशिक | जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र लेट खरीप कांदा लागवडीखाली file photo
Published on
:
30 Nov 2024, 10:20 am
Updated on
:
30 Nov 2024, 10:20 am
नाशिक : जिल्ह्यात ५८ हजार ७११ हेक्टर क्षेत्रावर लेट खरिप कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. १० नोव्हेंबरच्या आसपास ३३ हजार हेक्टर क्षेत्र कांदा लागवडीखाली आले होते. त्यात २७ नोव्हेंबरपर्यंत सुमारे २५ हजार हेक्टरने वाढ झाली.
यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. खरीप कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे लेट खरीप हंगामाला पंधरवड्याने विलंब झाला, तरीही चांदवड, मालेगाव, नांदगावमध्ये लेट खरीप कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. इतर तालुक्यांतही कांदालागवडीची लगबग पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यांत लागवड केलेल्या लेट खरीप कांद्याची काढणी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान केली जाते. यंदा ४७ हजार हेक्टर क्षेत्र कांदालागवडीसाठी निश्चित केले होते, त्यात प्रत्यक्षात सुमारे १० हजार हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून येते. अजूनही कांदालागवड सुरू असल्याने एकूण क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदा रोपवाटिकेत कांद्याच्या साडेसात हजार रोपांचीच लागवड पूर्ण झाली होती. त्याचा परिणाम लागवडीवर झाला आहे.
येवला, निफाड, सिन्नर, चांदवड, मालेगाव, बागलाण, देवळा हे तालुके कांदालागवडीसाठी महत्त्वाचे मानले जातात. यंदा दिंडोरीत लेट खरीप कांद्याची सर्वाधिक कमी (११६ हेक्टर), तर मालेगावमध्ये सर्वाधिक (१३ हजार हेक्टर) क्षेत्रावर लागवड झाली आहे.
तालुका - कांदा लागवड (हेक्टरमध्ये)
मालेगाव : १३,०००
चांदवड : १२,८५६
नांद : ८,९७६
देवळा : ८,७९७
येवला : ७,४७५
बागलाण : ४,६२0
सिन्नर : १,७९७.८
निफाड : ६३३.५
कळवण : ४८८
दिंडोरी : ११६
-------------------
एकूण - ५८,७११