Published on
:
19 Nov 2024, 5:17 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:17 am
नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व देवळाली या चार मतदारसंघांतील १,३२६ मतदांन केंद्रांवर महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत.
मतदान केंद्रांच्या इमारतीची, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, स्वच्छता, दिव्यांगांसाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांच्या पूर्ततेची पाहणी सोमवारी (दि. 18) महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी ६ पर्यंत मतदानप्रक्रिया चालणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम पूर्ण व देवळाली मतदारसंघाचा काही भाग येतो. नाशिक पूर्व मतदारसंघात ३३१, नाशिक मध्य मतदारसंघात ३०३, नाशिक पश्चिम मतदारसंघात ४१३, तर देवळाली मतदारसंघात २७९ मतदार केंद्रे आहेत. महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. बहुसंख्य मतदान केंद्रे महापालिकेच्या शाळा इमारतींमध्ये आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांत पोहोचण्यासाठी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान केंद्र असलेल्या शाळांची, त्यातील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
सर्व मतदान केंद्रांमध्ये मतदान कर्मचारी तसेच मतदारांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसमवेत याकामाची पाहणी केली. मतदान केंद्रांच्या स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मतदान केंद्र इमारती तसेच परिसराची स्वच्छता सुरू असून, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी सोमवारी पाहणी दौरा केला.
व्हीलचेअर, रुग्णवाहिकेची देखील सुविधा
दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून २२४ व्हीलचेअर तसेच रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नाशिक पूर्वमध्ये ६३, नाशिक मध्यमध्ये ६९, नाशिक पश्चिममध्ये ७१, तर देवळालीत २१ ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.