सिन्नर पोलिसांनी शहरातील विविध भागांत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाइृची मोहीम हाती घेतली आहे. Pudhari News network
Published on
:
30 Nov 2024, 7:08 am
Updated on
:
30 Nov 2024, 7:08 am
सिन्नर : बेशिस्त वाहनचालकांवर वचक बसावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सिन्नर पोलिसांनी शहरातील विविध भागांत बेशिस्त वाहनधारकांसह वाहनाची कागदपत्रे नसलेल्या व नियम डावलून वाहन चालवणार्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
90 दिवसांत वाहनधारकांवर कारवाई करत 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनधारकांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र चिने यांच्याकडून ही कारवाई सुरू आहे. शहरातील आडवा फाटा, बसस्थानक परिसर, मारुती मंदिर, संगमनेर नाका, वावी वेस परिसरात वाहनधारकांवर नजर ठेवली जात आहे.
दुचाकीधारकांमध्ये अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसून येत असल्यामळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हीच मुले रस्त्याने सुसाट वाहने चालवत असल्याचे चित्रदेखील बघायला मिळते. ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, बेशिस्त पार्किंग, सीटबेल्ट न लावणे, विना क्रमांकाच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 90 दिवसांत पोलिसांकडून अशा बेशिस्त वाहनधारकांकडून 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट, सीटबेल्टबाबत जनजागृती
ग्रामीण भाग असल्याने येथील दुचाकीधारक हेल्मेट घालण्याकडे व चारचाकी चालक सीटबेल्ट लावण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळे अपघातात मार लागल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. आता सिन्नर पोलिसांनी हेल्मेट व सीटबेल्टबाबत जनजागृती व्हावी व वाहनधारकांनी त्याचा नियमित वापर करावा यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जेणेकरून इतर वाहनधारकही याकडे गांभीर्याने लक्ष देतील.
गेल्या काही महिन्यांपासून शहर व तालुक्यातील विविध गावांतून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कामानिमित्त शहरात येणार्यांच्या दुचाकी अवघ्या काही वेळातच चोरी होत असल्याने हे सराईत चोरट्यांचेच काम असल्याचे दिसत आहे. दुचाकी चोरट्यांची टोळीही गेल्या महिन्यात पोलिसांनी पकडली होती. त्यात काही इतर घटनांचाही तपास लागला. मात्र त्यानंतर दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार कमी झाले असले, तरी चोरीच्या घटना घडतच आहेत. या चोरट्यांचा छडा लागावा यासाठीही पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.