नाशिक : निमा इंडेक्सच्या डोम उभारणीचे भूमिपूजन करताना दीपक चंदे. समवेत प्रबल रे, धनंजय बेळे, निखिल पांचाळ, आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, विवेक गोगटे, रमेश वैश्य, मधुकर ब्राह्मणकर आदी.Pudhari
Published on
:
30 Nov 2024, 4:33 am
Updated on
:
30 Nov 2024, 4:33 am
नाशिक : उद्योगजगत, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञानाचा संगम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार असल्याने, नाशिकच्या औद्याेगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी 'निमा इंडेक्स -२०२४' हे जागतिक दर्जाचे प्रदर्शन मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे ६ ते ९ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या प्रदर्शनाच्या डोम उभारणचे भूमिपूजन शुक्रवारी (दि.२९) दीपक बिल्डर्सचे संस्थापक अध्यक्ष दीपक चंदे यांच्या हस्ते आणि टीडीकेचे कार्यकारी अध्यक्ष प्रबल रे यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या प्रदर्शनात ४७५ स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व स्टॉल्स बुक झाले आहेत. प्रदर्शनाविषयी सांगताना बेळे म्हणाले, 'निमा इंडेक्स नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्याचे काम करेल. याशिवाय रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्यात मदत करेल. दीपक चंदे म्हणाले, नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याची मोठी संधी असून, सरकारला बहुमत मिळाल्याने हे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तर प्रबल रे यांनी, नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याची मोठी संधी असून, या ठिकाणी उद्योगांना पोषक वातावरण असल्याने, भविष्यात नाशिकला मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, गौरव ठक्कर, निमा सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, माजी अध्यक्ष विवेक गोगटे, रमेश वैश्य, मधुकर ब्राह्मणकर, आर. व्यंकटचालम, शशिकांत जाधव, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे राजेंद्र फड आदी उपस्थित होते.
- रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने परिपूर्ण स्टॉल्स
- इंडस्ट्री ४.० ची संकल्पना
- देशभरातील दोनशेपेक्षा अधिक खरेदीदार प्रदर्शनाला येणार
- ९५ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना बोलविणार
- राज्यात नव्याने होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठीच्या व्हेंडरची नोंदणी
- देश-विदेशातील उद्योगपतींना नाशिकची औद्योगिक क्षमता दाखवणे, स्थानिकांना संधी देणे
- मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू, आयटी, आयटीएस, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा, वित्त, शिक्षण, पर्यटन तसेच ईव्ही व एआयची विविध उत्पादने असलेली स्टॉल्स
'रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट'ची मान्यता
निमा इंडेक्स २०२४ प्रदर्शनाला महाराष्ट्र शासनाने 'रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट' म्हणून अंशत: मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकला नसला तरी, लवकरच शासनाकडून याबाबतचे पत्र निमाला दिले जाण्याची शक्यता आहे.