परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील हादगाव पावडे येथे सेलू- परतुर रस्त्यावर दोन तरुणांनी विद्युत मोटारची तार आणून ती जाळत असताना पोलीसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून विद्युत मोटार(Electric motor) तारेची किंमत २० हजार रुपये दुचाकी किंमत ३५ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा ५५ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
५५000 रुपयांचा मुद्देमाल जप्त
ही घटना हादगाव पावडे तालुका सेलू येथे रामदास पावडे यांच्या शेत गट क्रमांक ३७५ मध्ये २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता घडली. शनिवार ३० नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -परतुर रस्त्यावर हादगाव पावडे येथे रामदास पावडे यांच्या शेत गट क्रमांक ३७५ मध्ये दोन तरुणांनी विद्युत मोटारीची तार आणून ती जाळत असताना पोलीसांनी रियाज खान फिरोज खान वय १९ वर्षे राहणार परतुर आणि कृष्णा दिलीप भोरे वय २५ वर्ष राहणार आदर्श नगर सेलु यास ताब्यात घेतले. पोलीसांनी विद्युत मोटार तांब्याची तार किंमत २० हजार रुपये, दुचाकी एम.एच१९ए.एच.४०१४ किंमत ३५ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा ५५ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश ज्ञानोबा पावडे राहणार हदगाव यांने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमेनुसार रियाज खान, कृष्णा भोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिसे पुढील तपास करत आहेत.