परभणी/गंगाखेड(Parbhani):- एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून कोळशाची वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक्तीच्या रेल्वे खाली आत्महत्या(Suicide) करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी घडली होती. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गंगाखेड शहराला हदरविणाऱ्या या तिहेरी आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याने याचे गुढ कायमच आहे.
रुळावर झोपून माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे खाली सामूहिक आत्महत्या
गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक शाळेवर शिक्षक असलेल्या मसनाजी (मष्णा) सुभाष तुडमे वय ४५ वर्ष यांनी व त्यांच्या पत्नी रंजना मसनाजी (मष्णा) तुडमे वय ४० वर्ष, मुलगी अंजली मसनाजी (मष्णा) तुडमे वय २१ वर्ष सर्व रा. किनी (कद्दू) ता. अहमदपूर हल्ली मुक्काम काकाणी अपार्टमेंट गंगाखेड यांनी गुरुवार रोजी दुपारी त्यांची दुचाकी गंगाखेड रेल्वे स्थानकावर (Railway Station)लावून रेल्वे स्थानकापासून सुमारे दिड किलो मिटर अंतरावर परभणीच्या मार्गांवर पायी जात धारखेड शिवारातील सिग्नलजवळ रुळावर झोपून माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे खाली सामूहिक आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली होती. गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे २:३० ते ३ वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती रेल्वे चालकाने गंगाखेड रेल्वे स्थानक मास्टर राहुल डोंबे यांना दिली.
सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेड शहर हादरले
एका कुटुंबातील तिघांनी एकाच वेळी रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या केल्याच्या घटनेने गंगाखेड शहर हादरले होते. या घटनेची माहिती समजताच गंगाखेड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचे मृतदेह (Dead Body) उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मृतक मसनाजी (मष्णा) तुडमे यांचे मोठे भाऊ शिवाजी सुभाषराव तुडमे वय ५५ वर्ष रा. किनी (कद्दू) ता. अहमदपूर यांनी गुरुवार रोजी रात्री उशिराने दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शुक्रवार रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर या तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. तिहेरी सामूहिक आत्महत्येच्या धक्कादायक घटनेला दुसरा दिवस उजाळला मात्र या सामूहिक आत्महत्येबद्दल कोणतेच कारण समोर आले नसल्याने तिहेरी सामूहिक आत्महत्येचे गुढ कायमच आहे.
या घटनेमुळे गंगाखेड तालुका परिसरासह अहमदपूर तालुका हदरला असुन दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे हे करीत आहेत.