– तरुण राजकारणी झाले उद्विग्न
– भविष्यात सामान्यांनी निवडणूक लढवावी की नाही ? असा प्रश्न
– समाज माध्यमांवरही मतदारांच्या लाचारी वर टिका
परभणी/पाथरी (Pathari Election) : मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून निवडणुकीत उमेदवार निवडूण आणण्यासाठी पैसे वाटपाच सुरु झालेले लोण आता सबंध पाथरी मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत पोहोचले असून राज्याचे धोरण ठरवणार्या आमदार निवडणुकीत मतदारसंघात उमेदवारांकडून मोठ्या प्रमणात झालेल्या पैशाच्या वाटपाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. एकीकडे समाज माध्यमांवरही सुज्ञ नागरीकांकडून मतदारांना लाचार करत मत देण्यास प्रवृत्त करणार्या राजकारण्यांसह लाचार झालेल्या (Pathari Election) मतदारांवर टीकेची जोड उडाल्याचे पहायला मिळत असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये अशी परिस्थिती राहणार असेल भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी ही लढवाव्यात की नाही ? अशी चिंता तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नव्या उमेदीच्या तरुण राजकारण्यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघाची (Pathari Election) यावेळी झालेली निवडणूक सुरुवातीला दिग्गज उमेदवारांच्या बंडखोरीने चर्चेची राहिली .निवडणुकीमध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांच्या भव्य दिव्य प्रचार सभा , बैठका व गावोगावीच्या मतदारांना भेटीगाठी यावर भर देण्यात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांवर पैशांचा करण्यात आलेला भडीमार आता चर्चेचा विषय झाला आहे. ठिकठिकाणी दिग्गज उमेदवारांचे कार्यकर्ते आमच्या उमेदवाराने कसा पैसा वाटला कानाकोपऱ्यापर्यंत कसा पैसा पाऊस झाला या संदर्भात चवीने चर्चा केली जात आहे. मतदार हे चार चार उमेदवाराकडून पैसे कसे घेतले ? यावर भाष्य करताना दिसत आहेत. एका मतासाठी १ हजारापासून ते २ हजार रुपयापर्यंत पैसे देण्यात आल्याची धक्कादायक चर्चा असून चर्चेतून पैसा वाटपाची कोटीची कोटी आकडेवारी सांगितली जात आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघ हा सुपीक जमिनीचा भाग असून या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधामुळे सदनता पाहायला मिळते संपूर्ण मतदारसंघांमध्ये पक्ष व राजकारण्यांकडून भविष्यात नवीन नवीन योजना , विकास कामे ,शेतकरी कामगार यांच्यासाठी ध्येय धोरणे सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी आदी विषयांसारख्या आ वासून उभ्या असलेल्या गंभीर प्रश्नांना उत्तरे देण्याची गरज व संधी असताना यापूर्वी गंगाखेड मतदार संघात कुप्रसिद्ध झालेला पैसे वाटपाचा फंडा चढावडीने वापरण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान गावोगावी अचानक पाणंद रस्ते , शेतरस्ते , गावाशिवारातील नदीवर तात्पुरत्या स्वरूपात पुल उभारणे अशी तात्पुरत्या स्वरूपातील कामे यासह गावात धार्मिक स्थळांसाठी देणग्या ,सामाजिक कार्यासाठी लागणारे भांडे आदींचा वाटप कार्यक्रम करत मत खेचण्याचा केविलवाणी प्रयत्न करण्यात आला आहे.
ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर (Pathari Election) राजकारणाच्या माध्यमातुन गाव कुसात विकास घेऊन जाण्यासाठी स्वप्न पाहणारी तरुण राजकारणी मंडळींना धक्का बसला आहे . सामान्य कार्यकर्त्यांना यापुढे पैसा वाटपाचे हे लोण ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषदेचा निवडणुका यामध्ये पोहचले व अशा पद्धतीने पैशांचा वापर करत निवडणुका लढवावी लागणार असतील तर राजकारणापासून दोन हात दूर राहणे बरे असे मत ते व्यक्त करू लागले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सुज्ञ नागरिक या सर्व गैरप्रकाराचा निषेध करत असताना दिसून येत आहेत . पैशासाठी मत विकणाऱ्यांनी विकास ,समता , प्रगती , देशाची प्रगती याची अपेक्षा धरु नये , देशभक्ती ऐवजी गुलाम म्हणून जगण्याची सवय लावून घ्या असा उपरोधक सल्लाही माध्यमांवर करण्यात येणाऱ्या पोस्ट मधून देण्यात येत आहे.