Published on
:
22 Nov 2024, 12:53 pm
Updated on
:
22 Nov 2024, 12:53 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy Perth Test : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. पहिला कांगारू वेगवान गोलंदाजांनी कहर केला आणि संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 150 धावांत गुंडाळला. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाची भक्कम फलंदाजी उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ऑप्टस स्टेडियमवर कसोटीच्या पहिल्याच दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. हा कांगारूंच्या मैदानावरील एक नवा विक्रम आहे.
1952 नंतर प्रथमच घडले ‘असे’
पर्थ कसोटीत दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने चार, सिराजने दोन आणि हर्षित राणाने एक विकेट घेतली. पर्थच्या मैदानावर 1952 नंतर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 72 वर्षांत असे घडले नव्हते.
पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. कसोटीच्या पहिल्या दिवशी 31,302 प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. हा देखील या मैदानावर एक नवा विक्रम आहे.
ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात कांगारू संघाने अवघ्या 38 धावांवर पहिल्या पाच विकेट गमावल्या. 1980 नंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने 40 धावांच्या आत पहिले पाच विकेट गमावले आहेत. यापूर्वी 2016 मध्ये होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 17 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सात गडी तंबूत परतले.
बूम-बूम बुमराहचा भेदक मारा
बुमराहने स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह त्याचे नाव इतिहासाच्या पानात नोंदवले गेले. स्मिथला गोल्डन डकवर बाद करणारा बुमराह हा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 2014 साली द. आफ्रिकेच्या डेल स्टेनने कसोटीत पहिल्याच चेंडूवर स्मिथला बाद केले होते.