Published on
:
29 Nov 2024, 9:13 am
Updated on
:
29 Nov 2024, 9:13 am
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात, पिंपरी-चिंचवड महापालिकेला शहरातील मालमत्ताकराद्वारे 540 कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण तीन लाख 79 हजार मालमत्ताधारकांनी हा करभरणा केला आहे. त्यात सर्वाधिक 362 कोटी 74 लाख रूपयांची बिले त्यांनी ऑनलाइन भरली आहेत.
महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे, शहरातील 6 लाख 33 हजार 294 मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी सर्वाधिक 5 लाख 41 हजार 168 निवासी मालमत्ता असून 57 हजार 733 मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक 4 हजार 563, मोकळ्या जमिनी 11 हजार 323, मिश्र 16 हजार 1 आणि इतर 2 हजार 506 मालमत्ता आहेत. आर्थिक वर्षातील(1 एप्रिल ते 28 नोव्हेंबर)पहिल्या ऩऊ महिन्यात एकूण 540 कोटी रूपयांचा मालमत्ताकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 79 हजार मालमत्ताधारकांनी बिलभरणा केला आहे. थकबाकीची रक्कम 89 कोटी 80 लाख रूपये आहे. तर, 447 कोटी 61 लाख रूपये ही चालू मागणी आहे. त्यात 362 कोटी 74 लाख रूपये ऑनलाइन जमा झाले आहेत.
आयटीजीएस आणि एनईएफटीद्वारे 42 कोटी, रोखीने 41 कोटी 66 लाख तर धनादेशाद्वारे 37 कोटी 97 लाख रूपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. एकूण 35 कोटी 43 लाखांचे समायोजन करण्यात आले आहे. 83 कोटी 60 लाखांचा सर्वाधिकमालमत्ताकर वाकड विभागीय कार्यालयाकडे जमा झाला आहे. पाठोपाठ 50 कोटी 67 लाखांचा कर थेरगाव कार्यालयात तर, चिखलीतून 42 कोटी 73 लाख, पिंपरीगावातून 37 कोटी 82 लाख आणि भोसरीतून 37 कोटी 62 लाख रूपयांचा कर जमा झाला आहे. मागील वर्षी पहिल्या 9 महिन्यांत एकूण 633 कोटी रूपये जमा झाले होते. यंदा त्या तुलनेत कमी वसुली झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकूण 862 कोटी 70 लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवडणुका आचारसंहितेमुळे ती प्रक्रिया थांबली होती. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाईही सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
निवडणूक कामकाज संपल्याने आता लक्ष वसुलीकडे
लोकसभा तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी कर संकलन विभागातील बहुतांश कर्मचार्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज जवळजवळ ठप्प पडले होते. त्याचा परिणाम वसुलीवर झाला आहे. मागील वेळेस मालमत्ताधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसुल करण्यात आले होते. ते रद्द केल्याने ती रक्कम यंदा दिसत नाही. निवडणूक कामकाजातून सर्व कर्मचारी कामावर पुन्हा रूजू झाल्याने वसुलीचे काम वेगात केले जाणार आहे. त्याबाबत नियोजन केले आहे, असे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.