“मी पांडुरंगाचा भक्त आहे. माझ्या पिढ्यान पिढ्यांपासून पांडुरंगाची वारी सुरु आहे. मी 17-18 वर्षापासून वारी करत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विजयी होण्यासाठी आशिर्वाद मागायला आलो होतो. आता परमेश्वराने, मतदारांनी आशिर्वाद दिला, विजयी झालो म्हणून परत दर्शनाला आलो” असं लोहा विधानसभेचा नवनिर्वाचित आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. लोकसभेला तुम्ही अशोक चव्हाणांना पराभूत केलं, तेव्हा मंत्रिपद मिळेल असं वाटलं. त्यावेळेस मिळालं नाही. विधानसभेला निवडून आलात, पालकमंत्री पदासाठी तुमच्या नावाची चर्चा आहे. “ही गोष्ट खरी आहे. अशोक चव्हाणांना पराभूत केल्यावर सर्वांना असं वाटलं की, एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाला पराभूत केल्यावर मंत्रिपद मिळेल. पहिली टर्म त्यांच्या काही अडचणी त्यामुळे एखादवेळी संधी मिळाली नसेल. पण प्रत्येकाने जीवनात अपेक्षा ठेवणं चुकीच नाहीय. माझी विधानसभेची तिसरी लोकसभेची एक, ही चौथी टर्म आहे. विधानसभेच्या चार निवडणुका लढवल्या अपेक्षा असण्यात काही गैर नाही. शेवटी श्रेष्ठी जो काय निर्णय घेतील, परमेश्वर त्यांना सुबुद्धी देईल त्यातून मार्ग निघेल”
ग्रामपंचायत ते लोकसभा अशा 17 निवडणुकांना सामोरे गेले आहात. यावेळी सख्खी बहिण समोर उभी होती. “ही गोष्ट खरी आहे. कुटुंबातली व्यक्ती समोर असेल, तर त्रास होतो. मागच्या निवडणुकीत मी त्यांना निवडून आणलेलं. पण ते नीट वागले नाहीत. म्हणून मला पुन्हा निवडणुकीत उतरावं लागलं. शेवटी माझा पारंपारिक मतदारसंघ आहे. 1992 पासून त्या भागाच मी जिल्हा परिषदेत नेतृत्व केलं आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. मला निवडून दिलं. मी लोकांचे आभार मानतो”
‘लोकांनी प्रेम, परमेश्वराने आशिर्वाद दिला’
मतदारसंघाच्या अडचणीबद्दल बोलताना प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, “मतदारांच्या गावापर्यंतच्या अडचणी मला माहित आहेत. बरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. लोहा तालुक्यात एखाद्या उद्योग आणता येईल का? हे पाहणं माझं काम आहे. बाकी छोटी-मोठी काम होतील. सिंचनाच्या प्रश्नसाठी काम करेन” काँग्रेस, भाजप, शिवसेनेत, काम केलं, आता हातात राष्ट्रवादीच घड्याळ बांधणार की जय श्रीराम म्हणणार? त्यावर ते म्हणाले की, “पहिली निवडणूक शिलाई मशीन, दुसरी कप बशी, तिसरी धनुष्यबाण, चौथी कमळ आणि आता घड्याळ चिन्हावर लढवली. आता चिन्हही शिल्लक राहिलेलं नाही. लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं. लोकांनी प्रेम, परमेश्वराने आशिर्वाद दिला. आता माझं पक्ष बदलण्याच वय राहिलेलं नाही. शेवटपर्यंत घड्याळ कायम राहणार”