Maharashtra Assembly Election 2024: दौंडचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. राहू येथील मतदान केंद्रावर जावून आमदार राहुल कुल, त्यांच्या पत्नी कांचन कुल, आई माजी आमदार रंजना कुल यांनी मतदान केले आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी ते पार पाडावे असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.