पुणे जिल्ह्यात चुरशीच्या लढती; आज मतदान file photo
Published on
:
20 Nov 2024, 4:53 am
Updated on
:
20 Nov 2024, 4:53 am
Maharashtra Assembly elections 2024: राज्य विधानसभेसाठी आज, बुधवारी (दि. 20) मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 304 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद होईल. सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत आहे. काही ठिकाणी बंडखोरीमुळे तेथे आघाडी व युतीअंतर्गत संघर्ष वाढला आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
गेल्या तीस दिवसांपासून उमेदवारांनी उडविलेला प्रचाराचा धुराळा, नेत्यांच्या सभा, त्यातून झालेले आरोप-प्रत्यारोप या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदानात मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार हे आज ठरणार आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व दहाही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महाविकास आघडीचे नेते खासदार शरद पवार आणि महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या होम ग्राउंडवर कसोटी पाहाणारी ही निवडणूक आहे. बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्यातच पवार काका-पुतण्यात मोठा संघर्ष सुरू आहे. प्रचंड चुरस असल्यामुळे जिल्ह्यातील बारामतीसह कोणत्याही लढतीच्या निकालाचा अंदाज
व्यक्त करणे, हे अशक्यप्राय होऊन बसलेले आहे. शरद पवारांना खरेच पुन्हा लोकसभेप्रमाणे सहानभूती मिळेल का? अजित पवारांचा प्रभाव पडेल का? अपक्षांचा फटका कुणाला बसेल? अशा अनेक प्रश्नांभोवती ही निवडणूक फिरत आहे.
या वेळी प्रथमच निवडणुकीचा अंदाज व्यक्त करणे अगदी बारामतीसह अशक्य झालेले आहे. बारामती, इंदापूर, शिरूर-हवेली, जुन्नर, भोर, पुरंदर-हवेली, मावळ, खेड-आळंदी या मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीच्या लढती आहेत. अतिशय अल्पमतांनी येथील निकाल लागू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.
पवारांच्या या ’होम ग्राउंड’वर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यांनीही त्याच पद्धतीने प्रचार आणि डावपेच खेळलेले आहेत. जुन्नर, पुरंदर-हवेली, इंदापूर, भोर या मतदारसंघांत बंडखोरीचा फटका कोणाला बसतो, यावर निकाल अवलंबून आहे. कोणत्या पवारांचे वर्चस्व जिल्ह्यावर राहणार हे ठरविणारी ही निवडणूक असून, आता बुधवारी मतदानात मतदारराजा काय करतो, हे शनिवारी मतमोजणीच्या दिवशीच कळेल.
पुणे शहरातील आठही मतदारसंघांत चुरशीच्या दुरंगी आणि तिरंगी लढती असल्याने आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदार संघातील 121 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बेद होणार आहे.
मतदानाच्या टक्केवारीवर अनेक मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठीची मोर्चेबांधणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाल्यानंतर मंगळवारी सर्वच उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी आणि मतदानाचे नियोजन यातच दिवस घालविला. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील तब्बल 16 लाख 63 हजार 654 मतदार नागरिक बुधवारी (दि.20) मतदान करणार आहेत.
88 लाखांपेक्षा अधिक मतदार ठरविणार भवितव्य
जिल्ह्यात 88 लाख 49 हजार 590 मतदार असून 45 लाख 79 हजार 216 पुरुष मतदार आणि 42 लाख 69 हजार 569 महिला मतदार तर 805 तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक 6 लाख 63 हजार 622 मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी 2 लाख 83 हजार 635 इतके कसबा पेठ मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात 13 हजार 694 मतदान यंत्र (ईव्हीएम) याचबरोबर 10 हजार 144 कंट्रोल युनिट आणि 10 हजार 993 व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.