Supriya Sule Voting: खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती शहरातील मएसो विद्यालयात विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ज्येष्ठ नेत्या प्रतिभा पवार यांनीही मतदान केले. यावेळी रणजित पवार, शुभांगी पवार, देवयानी पवार, इरा पवार यांनीही मतदान केले. मतदानानंतर खा. सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीला राज्यातील मतदार साथ देतील असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.