रायगड जिल्हयातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या सात मतदारसंघाची निवडणूक होत आहे.
Published on
:
19 Nov 2024, 5:10 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:10 am
रायगड ः रायगड जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी होणार्या सात विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज आहे. 15 हजार मतदान कर्मचारी व 5 हजार पोलीस असे 20 हजार कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मागच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का निश्चित वाढेल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हयातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या सात मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सात जागांसाठी 73 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर पुरुष मतदार 12 लाख 59 हजार 567 तर महिला मतदार 12 लाख 29 हजार 130 मतदार, तृतीय पंथी 91 असे एकूण 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 15 हजार 169 मतदान कर्मचारी तर पोलीस व होमगार्ड असे 4 हजार 300 असे सुमारे एकूण 20 हजार कर्मचारी असणार आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी वृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणार्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही सरमिसळीकरणदेखील झाले आहे.
तसेच या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपेंट मशीन्सची सिलींग करण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार माहिती चिठ्ठीचे 98 टक्के वितरण झाले आहे.मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत. 50 मतदान केंद्रावर मोबाईल फोनला कनेक्टिव्हीटी नसल्याने सॅटेलाईट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आचारसंहित भंगाच्या तक्रारी, दाखल झालेले गुन्हे याबाबतही जिल्हाधिकारी जावळे यांनी माहिती दिली. मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 7 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी 6 नंतर प्रचार करता येणार नाही. रायगड जिल्हयात मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे त्यांंनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीही पोलीस प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर केला.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाकरीता जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे यावे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड
बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रयत्न
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत पेणमधील बाळगंगा प्रकल्पग्रस्त दहा गावांनी बहिष्कार टाकला होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे बाळगंगा प्रकल्पग्रस्त मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. तर उरणमधील हनुमान कोळीवाडा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्याबरोबरही चर्चा सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी जावळे यांनी दिली.
आजपर्यंत भारत निवडणूक आयोगाच्या तक्रार निवारणावर जिल्ह्यात एकूण सीव्हिजील अॅपवर 50 तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी 45 केसेस मध्ये वस्तुस्थिती आढळून आली आहे. 50 केसेसपैकी 45 केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. तर 5 केसेस चुकीच्या पध्दतीने केलेल्या केसेस रद्द करण्यात आल्या. तसेच टोल फ्री क्रमांक 1950 वर 69 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.