दै. ‘पुढारी’च्या विद्यमाने राईज अप महिला बॅडमिंटन सीझन 3 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, खेळाडूंसह पालकांनीही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे राष्ट्रीय बॅडमिंटनपटू शरयू रांजणे हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धा पूना डिस्ट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. स्पर्धेत अकरा, तेरा, पंधरा, सतरा, एकोणीस वयोगटामध्ये एकेरी आणि दुहेरी गटाच्या होणार आहेत. महिलांसाठी होणार्या गटांमध्ये खुला गट, 30 वर्षांवरील, 35 वर्षांवरील, 40 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील अशा एकेरी आणि दुहेरी गटात या स्पर्धा होणार असून, स्पर्धेत तब्बल दहा वयोगटांत मुली आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड या ठिकाणांहून खेळाडूंचा मोठा सहभाग आहे. स्पर्धेतील सर्व वयोगटांतील विजेत्यांना तब्बल अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, पदके, ट्रॉफी, तर सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. त्या वेळेपासूनच खेळाडू तसेच पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या राईज अप सीझन 3 साठी माणिकचंद ऑक्सिरीच हे मुख्य प्रायोजक असून, स्किन केअर पार्टनर रूप मंत्रा तसेच हेल्थ पार्टनर म्हणून अमृत नोनी हे प्रायोजक आहेत. सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या वतीने खेळाडूंसाठी फिजिओथेरपी डॉक्टरांचे पथक उपलब्ध करून देण्यात आले होते.
दै. ‘पुढारी’ आयोजित या स्पर्धेमध्ये माझी मुलगी सातत्याने खेळत आली आहे. तिची ही तिसरी स्पर्धा असून, एखाद्या वृत्तपत्राने एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियोजनबध्द स्पर्धा भरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून एका बाजूला खेळाडूंना व्यासपीठ तर मिळतच आहे, तर दुसर्या बाजूला जास्त खेळाडूंमुळे समोरच्या खेळाडूच्या खेळाचा अभ्यासही करता येतो. दै. ‘पुढारी’ने खेळाडूंसाठी हे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप आभारी आहोत.
समीर जिनराळकर (बॅडमिंटनपटू योगश्रीचे पालक, सिंहगड रोड)
दै. ‘पुढारी’ने मुलींसाठी हे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, यावर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धेमध्ये अशा चांगल्या स्पर्धेला मुकावे लागते, ही मोठी खंत मनात कायम राहील.
- शरयू सुजित रांजणे (राष्ट्रीय बॅडमिंटनपटू)
दै. ‘पुढारी’सारख्या वृत्तपत्रसमूहाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॅडमिंटनची स्पर्धा केवळ मुलींसाठीच आयोजित केली आहे. या स्पर्धेला एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग असण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. दै. ‘पुढारी’ने खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. स्पर्धेत मोफत प्रवेश दिला असून, रोख पारितोषिकांसह पदक, करंडक आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिकेही ठेवली आहेत. नक्कीच ही स्पर्धा भविष्यात राज्यपातळीवरील स्थान गाठेल.
- राजीव बाग (राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक)