जामखेड : शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर तालुक्यातील काटेवाडी येथील शेतकऱ्याच्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलुप तोडुन घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कमेसह पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विश्वनाथ तुळशीराम बहीर (वय 70 वर्षे) हे शनिवार दि 25 रोजी सकाळी अकरा वाजता घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह शिऊर फाटा येथील त्यांच्या शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. घरात कांद्याच्या पट्टीचे रोख दोन लाख रुपये व काही सोन्याचे दागिने त्यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले होते. याच दिवशी दुपारी एक वाजता त्यांच्या गावत रहाणारे हरीभाऊ बापुराव मुळे यांनी फिर्यादी यांना फोन करून सांगितले की तुमचा नातू रडत माझ्याकडे आला आहे. तसेच तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे तुमच्या घरी चोरी झाली आहे तुम्ही लवकर घराकडे या, असे म्हणताच फिर्यादी बहीर हे तातडीने घराकडे आले व घरात जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटाचा ड्रावर तोडलेला दिसला व त्यांच्या घरात चोरी झाली असल्याचे लक्षात आले.
यावेळी त्यांनी घरातील कपाटात कांदा विकून आलेले 2 लाख रुपये रोख व 1 लाख 76 हजार 750 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 76 हजार 750 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादी विश्वनाथ तुळशीराम बहीर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.