अजित पवारांवर कसला अन्याय? चारदा उपमुख्यमंत्री,अनेक पदे; शरद पवार यांची टीका Pudhari
Published on
:
20 Nov 2024, 6:17 am
Updated on
:
20 Nov 2024, 6:17 am
Baramati News: अजित पवारांवर कसला अन्याय? चार वेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्ष मंत्री पद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता? या शब्दात ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
माळेगावमध्ये श्रीमंत शंभूसिंह विद्यालयात शरद पवार यांनी बारामती विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल व कॉलेजमध्ये शरद पवार, प्रतिभा पवार रेवती सुळे, सदानंद सुळे व विजय सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी शरद पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी प्रचार सांगता सभेत पत्र सादर केले. या पत्रात अजितवर अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्यासंबंधी पवार म्हणाले, त्यांना अनेक वर्षे सत्ता मिळाली. चार वेळा उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक वर्ष मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर कसला अन्याय झाला? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान शरद पवारांनी राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. हे सरकार बहुमताचे असेल. मी काय ज्योतिषी नाही. जागा निश्चित सांगणार नाही. परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान आज काटेवाडी मध्ये अजित पवार यांनी महायुतीचे सरकार राज्यात येणार असून, १७५ जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल. ते बहुमताचे सरकार असेल. नेमक्या जागा किती हे सांगायला मी ज्योतिषी नाही. परंतु अजित पवार यांच्या संख्येचा संदर्भ लक्षात घेता त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या असा उलट टोला पवार यांनी लगावला.
बिटकाॅईन संबंधी बोलण्याची आवश्यकता नाही
बिटकॉइनच्या संदर्भातील प्रश्न शरद पवारांना विचारला असता ते, म्हणाले, जी व्यक्ती गुन्हेगार आहे. तुरुंगात होती त्या व्यक्तीच्या मनाला काय अर्थ आहे..! त्याच्यावरती बोलण्याची तरी आवश्यकता आहे का? असे शरद पवार म्हणाले.