क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने डोंबिवलीत जप्त केलेली पिस्तुले(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
19 Nov 2024, 11:12 am
Updated on
:
19 Nov 2024, 11:12 am
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराचे गालबोट लागून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना गुंड-गुन्हेगारांचे पेकाट मोडून काढण्यासाठी स्वायत्तता दिली आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांनुसार क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. अग्निशस्त्र तस्करीचे डोंबिवली-उत्तरप्रदेश कनेक्शन उघड करून अग्निशस्त्रे विक्रीसाठी डोंबिवलीत दाखल झालेल्या एका उत्तरभारतीयाची गठडी वळून त्याच्याकडून देशी बनावटीच्या 2 पिस्तुलांसह 4 काडतुसे हस्तगत करण्यात क्राईम ब्रँचने यश मिळविले आहे.
सुधीर रामनिवास ठाकूर (22) असे अटक करण्यात आलेल्या बदमाशाचे नाव असून तो उत्तरप्रदेशातल्या फतेहाबाद जिल्ह्यातील नगला जगमोहन गावचा रहिवासी आहे. या बदमाशाच्या पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ रेल्वे मैदान परिसरातून मोठ्या कौशल्याने मुसक्या आवळल्या आहेत. निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांचा मनाई आदेश भंग करून अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबद्दल या बदमाशाच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर ठाकुर हे मुळचे उत्तरप्रदेशातील फतेहाबाद जिल्ह्यातील नगला जगमोहन गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जवळून ९४ हजार रूपये किमतीची दोन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आली आहेत.
पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ परिसरात असलेल्या रेल्वे मैदानासमोरच्या गणेश मंदिराजवळ एकजण देशी बनावटीची लोडेड पिस्तूले विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर खासगी गुप्तहेराकडून क्राईम ब्रँचचे हवालदार मिथुन राठोड यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष उगलमुगले, फौजदार विनोद पाटील, अनुप कामत, किशोर पाटील, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विलास कडू या पथकाने तात्काळ ठाकुर्ली उड्डाण पूल भागातील रेल्वे मैदान परिसरात जाळे पसरले. तेथील गणेश मंदिराजवळ एकजण संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पथकाने तात्काळ घेराव घालून बदमाशाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ देशी बनावटीची 2 पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे आढळून आली. पथकाने अग्नीशस्त्रांसह सुधीर ठाकूर याला ताब्यात घेतले.
निवडणूकीमध्ये हिंसाचाराचा इरादा आहे का ?
अग्नीशस्त्रांचा हा साठा सुधीर ठाकूर याने कुठून आणला ? ही अग्निशस्त्रे तो डोंबिवलीमध्ये कुणाला विकणार होता ? त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत का ? अग्निशास्त्रांची खरेदी-विक्री करणारा डोंबिवलीमध्ये कुणी दलाल आहे का ? निवडणुकीमध्ये दहशत, हिंसाचार वा घातपात घडविण्याचा कुणाचा इरादा आहे का ? याचा चौकास तपास करण्यासाठी क्राईम ब्रँचने तपासचक्रांना वेळ दिला आहे.