Published on
:
19 Nov 2024, 8:08 am
Updated on
:
19 Nov 2024, 8:08 am
ठाणे : कळवा येथे आठवड्यापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. बालजी यादव (31) असे मृताचे नाव आहे. त्याने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे. बालजी याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. तसेच त्याचा शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.
कळवा येथील पारसिकनगर अग्निशमन दल केंद्राजवळील जॉगिंग ट्रॅक परिसरात 10 नोव्हेंबरला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांनी या मृतदेहाची पाहाणी केली असता, मृतदेहाचे शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होते. तर त्याचे धड झाड्याच्या बुंध्याला गळून पडले होते. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते.
व्यक्तीच्या शर्टच्या कॉलरवर एका टेलरचे नाव छापील होते. तसेच त्याच्या शर्टच्या खिशामध्ये मुंब्रा येथील एका दवाखान्याची चिठ्ठी होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची काही पथके तयार करण्यात आली. संबंधित शिवणकाम करणार्या व्यक्तीच्या दोन महिन्यांची पावती पुस्तके पोलिसांनी तपासली. तसेच दवाखान्यात विचारणा केली असता, 20 दिवसांपूर्वी बालगोविंद यादव नावाचा व्यक्ती भाऊ हरविला असल्याची चौकशी करण्यासाठी आला असल्याची माहिती तेथील दवाखान्यातील कर्मचार्याने दिली. पोलिसांनी तात्काळ बालगोविंद याला संपर्क साधला. तसेच मृतदेहाचे कपडे आणि बुट दाखविण्यात आले. हे कपडे आणि बुट त्याचा भाऊ बालजी यादव याचे असल्याचे त्याने स्पष्ट केले.