Published on
:
19 Nov 2024, 6:24 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:24 am
सुशिक्षित आणि सुसंस्कृतांची नगरी म्हणून ओळख असलेला डोबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून मागील तिन्ही वेळेस भाजपाचे रविंद्र चव्हाण मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपाकडून त्यांना चौथ्यांदा रिंगणात उतरले आहे. रविंद्र चव्हाण यांची या मतदारसंघावर मजबूत पकड आहे. भाजपाचा राज्यातील सुरक्षित मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या या मतदार संघात रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना उबाठाने दिपेश म्हात्रे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की मशाल तेवणार ? कोण कुणाला आव्हान देणार ? याकडे समस्त डोंबिवलीकरांच्या नजरा लागल्या आहेत.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी
मतदार 3 लाख 38 हजार 330 मतदार आहेत.
पुरुष 1 लाख 74 हजार
महिला 1 लाख 63 हजार
2019 चे मतदान
रविंद्र दत्तात्रय चव्हाण (भाजपा) : 86,227
मंदार श्रीकांत हळबे (मनसे) : 44,916
राधाकिा मिलिंद गुप्ते-केतकर (काँग्रेस) : 6,613
2014 चे मतदान
रविंद्र दत्तात्रय चव्हाण (भाजपा) : 83,872
दीपेश पुंडलिक म्हात्रे (शिवसेना) : 37,647
हरिश्चंद्र कचरू पाटील (मनसे) : 11,978
2009 चे मतदान
रविंद्र दत्तात्रय चव्हाण (भाजपा) : 61,104
राजेश शांताराम कदम (मनसे) : 48,777
शंकरलाल मोतीलाल पटेल (काँग्रेस) : 9,064
2008 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतर डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे. भाजपाचे विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण येथून प्रतिनिधित्व करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मतदारसंघावर आरएसएसची मजबूत पकड आहे. त्यामुळे भाजपाच्या जवळचा मतदार या मतदारसंघात भाजपाला मतदान करतो. या मतदारसंघात कोकणी, मालवणी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यानंतर गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय देखिल मोठ्या संख्येने आहेत. ही मंडळी देखील भाजपाला मतदान करतात.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदारसंघात अनेक जण उभे होते. पण 2019 मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. आता पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात चव्हाण देखिल मंत्री आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे आणि आता चौथ्यांदा ते रिंगणात आहेत. डोंबिवलीत अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे यंदा त्यांना काहीसा फटका बसू शकतो. पण तरी देखील महाविकासआघाडीला उमेदवाराला येथे टफ फाईट देण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
महाविकास आघाडीकडून दीपेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे भाजपाच्या या बालेकिल्ल्यात जर सुरुंग लावायचा असेल तर महाविकास आघाडीला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. 2019 मध्ये रविंद्र चव्हाण यांना मनसेच्या मंदार हळबे यांनी चांगली टक्कर दिली होती. श्रीकांत हळबे यांना 41 हजार 311, तर रविंद्र चव्हाण यांना 83 हजार 872 मते मिळाली होती.
सदानंद थरवळांच्या पत्राचा इम्पॅक्ट होईल का
शिवसेनेत सामान्य शिवसैनिकाऐवजी केवळ पैशांच्या ताकदीला (मनी पॉवर) प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत सामान्य शिवसैनिकांचा जीव घुसमटतो आहे. गेल्या पाच दशकांमध्ये डोंबिवलीकरांनी नेहमीच वैचारिकदृष्ट्या शिवसेना-भाजपा युतीला साथ दिली. या युतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी स्वर्गीय बाळासाहेबांना लिहिलेल्या अनावृत्त पत्रातून पाठिंबा व्यक्त केला आहे.डोंबिवली विधानसभा निवडणुकीत उमेदवारीतून डावलल्याने थरवळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. सोमवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून थरवळ यांनी पत्र लिहिले आहे.शिवसेना या चार अक्षरी मंत्राने झपाटलेला मी तुमचा आणि दिघेसाहेबांच्या ठाणे जिल्ह्यातला कट्टर शिवसैनिक असून या युतीचा भाग असलेल्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्हांस जवळून काम करण्याची संधी मिळाली. बारा वर्षांपूर्वी तुम्ही आमच्यातून कायमचे निघून गेलात तेव्हा तुमच्या पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी लोटलेल्या लाखो शिवसैनिकातला मी एक शिवसैनिक असल्याचे थरवळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
ते पुढे लिहितात की तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देणारे त्या दिवशीचे फलक मला आजही डोळ्यासमोर येतात....
श्वासाची माळ तुटली...ध्यासाची नव्हे...साहेब शिवसेनेचा आणि... तुमचा ध्यास घेतलेली आमची कट्टर शिवसैनिकांची पिढी असल्याच्या भावना त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केल्या.
80 टक्के समाजकारण करणार्या आमच्यासारख्या शिवसैनिकांऐवजी आता 100 टक्के अर्थकारण आणि राजकारण करणार्यांना प्राधान्य दिले जात असल्याची खंत व्यक्त करणार्या थरवळ या जेष्ठ शिवसैनिकाने लिहिलेले पत्र वेगाने प्रसारित होत आहे. शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी 44 वर्षे संघटनेसाठी दिली. पण आज जेव्हा डोंबिवलीचं विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी आली तेव्हा एकनिष्ठपणा, संघटनेतील काम, सामाजिक कार्य यावर स्वार्थी राजकारण आणि पैसा सरस ठरलं याबद्दल त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांचा थेट रोख शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वावर होता.