अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला.Pudhari News Network
Published on
:
19 Nov 2024, 5:40 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:40 am
ठाणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात बाईक रॅली काढून सर्व पक्षीय उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर. आमदार जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, केदार दिघे, नरेश मणेरा यांच्यासह बहुतेक उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. याठिकाणी दोन्ही गटाने एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद निवळला.
‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशी ठाण्याची ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवीत आहेत. यामुळे या मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगला आहे.
शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना यावरुन जोरदार घोषणाबाजी झाली.Pudhari News Network
एकनाथ नसता तर हे शक्य होत का ? या टॅगलाईनने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु असून केदार दिघे यांच्या दिघे आडनावाचा करिष्मा ही प्रचारात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटाकडून मात्र कोणत्याही वादाविना प्रचार सुरू असतानाच निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दुपारी दोन्ही गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. कोपरी येथील अष्टविनायक चौकात शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते दुचाकी रॅलीसाठी जमले होते.
आयेगा तो धनुष्यबाणही...आयेगी तो मशालही
रॅलीदरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांची दुचाकी रॅली येथून जात होती. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. "केदार दिघे आगे बडो..आयेगी तो मशालही", अशा घोषणा ठाकरे गटाकडून देण्यात येत होत्या. तर, "एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ है, आयेगा तो धनुष्यबाणही" अशा घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात येत होत्या. घोषणाबाजीमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.