Published on
:
19 Nov 2024, 5:54 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:54 am
डोंबिवली : एकीकडे शासन प्रशासनाची उदासीनता, तर दुसरीकडे राजकारण्यांचे समाजाच्या पर्यावरणीय प्रश्न सोडविण्यात अनास्था या दोन्ही कारणांनी प्रदूषित झालेल्या उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आजतागायत अनुत्तरीत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी उल्हास 'नदी पे चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला होता. तथापी प्रचारात मशगूल असलेल्या उमेदवारांनी पाठ फिरवल्याने भ्रमनिरास झालेल्या उमाई पुत्रांनी येत्या 20 तारखेला होणार्या मतदानाच्या माध्यमातून राजकारण्यांना इंगा दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे.
नदीच्या प्रदूषणावर चर्चा करून ठोस उपाय शोधण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला स्थानिक निवडणूक उमेदवारांनी पूर्णतः पाठ फिरवली. त्यामुळे या महत्त्वपूर्ण विषयावर नेत्यांच्या गंभीरतेचा अभाव उघड झाला आहे. सर्व उमेदवारांना या कार्यक्रमासाठी आवर्जून आमंत्रण देण्यात आले होते, मात्र फक्त एकच उमेदवार उपस्थित राहिले. इतर उमेदवारांनी या विषयाकडे दुर्लक्ष करत आपल्या जबाबदारीपासून पळ काढल्याचे दिसून आले. उल्हास नदीच्या समस्या फक्त नागरिकांच्या किंवा पर्यावरणप्रेमींच्या नव्हे, तर नेत्यांच्या धोरणांमध्येही महत्त्वाची असायला हव्या. परंतु या घटनेने स्पष्ट केले की, अनेक नेत्यांसाठी पर्यावरणीय प्रश्न प्राधान्याच्या यादीत नाहीत.
उल्हास नदीवरील विषय दुर्लक्षितPudhari File Photo
उमेदवारीसाठी मते मागणारे नेते जर उल्हास नदीसारख्या महत्त्वाच्या विषयावर येण्याचेही कष्ट घेत नसतील, तर त्यांच्याकडून भविष्यात काय अपेक्षा ठेवायच्या ? हे फक्त निराशाजनकच नाही तर अपमानास्पद आहे. आपल्या परिसरातील लाखो लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणार्या या प्रश्नावर असे वर्तन पूर्णतः अक्षम्य आहे.