Published on
:
29 Nov 2024, 10:43 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:43 am
डोंबिवली : आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून अन्य इसमाने काही गैरव्यवहार केले आहेत...ऑनलाईन मटक्याच्या माध्यमातून तुम्ही दोन कोटी रूपये कमावले आहेत...त्यामुळे तुम्ही गुन्हेगार आहात...सुप्रीम कोर्टाच्या हुकुमानुसार तुमच्यावर अटकेची कारवाई होणार...अशा पोकळ पण गंभीर स्वरूपाच्या धमक्या देत मुंबईतून बोलणाऱ्या दोघा तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी डोंबिवली जवळच्या पलावा गृहसंकुलात राहणाऱ्या एका 69 वर्षीय सेवानिवृत्ताची तब्बल 74 लाख रूपये उकळल्याचा प्रकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे. तक्रारदार गृहस्थ एका परदेशी कंपनीतून मोठ्या पदावरून निवृत्त झाले असून ते पलावा येथे पत्नीसह राहतात.
सेवानिवृत्त गृहस्थाला काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तिने संपर्क साधला. मी मुंबईतील पोलिस ठाण्यातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बोलत आहे. तुम्ही मोबाईलसाठी नवीन सीमकार्ड घेतले आहे. या कार्डसाठी तुम्ही वापरलेल्या आधारकार्डच्या माध्यमातून एका इसमाने गैरव्यवहार केले आहेत. तुम्ही मटक्याच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमावले आहेत, असे बोलत तोतया पोलिस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला गोंधळून टाकले. तुम्ही केलेल्या गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार आमच्याकडे चौकशीसाठी आली आहे. या प्रकरणात आम्ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस पाठवत आहोत. तुम्हाला अटक करण्याचा हुकूम आमच्याकडे आहे. तुम्हाला अटकही करू शकतो, असे दुसऱ्या एका तोतया पोलिस अधिकाऱ्याने सेवानिवृत्ताला धमकावले.
या साऱ्या प्रकाराने सेवानिवृत्त गृहस्थ गोंधळून गेले. मी नवीन सीमकार्ड घेतलेले नाही. ऑनलाईन व्यवहारातून माझ्याकडे पैसे आले नाहीत. मी कोणताही गैरव्यवहार केला नाही. मी स्वतः कमविलेल्या पैशांतून माझा उदरनिर्वाह करतो, असे सेवानिवृत्ताने तोतया पोलिस अधिकाऱ्याला गयावया करून सांगितले. मात्र ते दोन्ही तोतया पोलिस अधिकारी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तुम्ही गैरव्यवहार केला हे सिध्द करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यात जेवढी रक्कम असेल तेवढी आमच्याकडे तपासासाठी वळती करा. या प्रकरणाची चौकशी करून ती रक्कम नंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या बँक खात्यावर पाठविली जाईल, असे तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. धमक्यांनी भयभीत झालेल्या सेवानिवृत्ताने 74 लाखांची रक्कम तोतया पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर वळती केली. घडला प्रकार सेवानिवृत्ताने आपल्या मित्राला सांगितला. मित्र चाणाक्ष असल्याने त्याने फसवणूक झाल्याचे सेवानिवृत्त गृहस्थाला सांगितले. सेवानिवृत्ताने कागदोपत्री पुराव्यांसह तातडीने सायबर गुन्हे अन्वेषण विभागासह मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एकीकडे या तक्रारीनुसार पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपासचक्रांना वेग दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील त्या दोघा तोतया पोलिस अधिकाऱ्यांना हुडकून काढण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.