भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर काही खास करेल की नाही याची शंका क्रीडाप्रेमींच्या मनात होती. कारण मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत दारूण पराभव झाल्यानंतर शंकेची पाल चुकचूकत होती. पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी पाहून तसंच वाटलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. 150 धावांचं पहिल्या डावातील आव्हान ऑस्ट्रेलियाला भारी पडलं. कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. तसेच ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर रोखत 46 धावांची आघाडी घेतली. आता इथून पुढे फलंदाजांच्या खांद्यावर भिस्त होती. त्यामुळे भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून होतं. पण केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने निराश केलं नाही. दोघांनी मिळून नाबाद अर्धशतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 90 आणि केएल राहुलने नाबाद 62 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया आणि स्लेजिंग हा प्रकार काय नवा नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. पण गेल्या काही वर्षात त्यांचा हा फासा त्यांच्यावर उलटला आहे. असंच काहीसं पहिल्या कसोटीत पाहायला मिळालं.
ऋषभ पंत फलंदाजी करत असताना नाथन लियोनने त्याला आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार? असा प्रश्न विचारून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तितक्याच मिश्किलपणे ऋषभ पंतने उत्तर दिलं होतं. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्कला डिवचलं. डावाच्या सुरुवातीपासून बचावात्मक खेळत यशस्वी जयस्वालने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना वेडंपिसं केलं. त्यानंतर बिनधास्तप्णे स्टार्कला सामोरं गेला. मिडविकेटवरून चौकार मारला. त्यामुळे स्टार्क त्याला बाउंसर टाकत होता. पण त्याची ही रणनिती पाहून यशस्वीने स्लेजिंग अस्त्र काढलं आणि म्हणाला, ‘चेंडू खूपच स्लो येत आहे.’. त्याचं म्हणणं ऐकून स्टार्कही हसू लागला.
JAISWAL TO STARC:
“It’s coming excessively slow” 😄🔥 pic.twitter.com/MXziersdUP
— Johns. (@CricCrazyJohns) November 23, 2024
ऑस्ट्रेलियात भारताच्या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलपूर्वी ही कामगिरी विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्राने केली होती. अशी कामगिरी सेहवागने आणि चोप्राने दोन वेळा केली होती. त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी अशी कामगिरी करण्यात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांना यश आलं आहे.