महाराष्ट्रातील महत्वाच्या विधानसभेच्या लढतीमधील महत्वाची लढत होत असलेल्या मुंब्रा-कळवा मतदार संघांच्या निवडणुकीकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठी, आगरी आणि मुस्लिम बहुल मतदार संघ असलेल्या मतदार संघात गेली अनेक वर्ष जितेंद्र आव्हाड हे निवडणून येत आहेत. यावेळी त्यांचेच एकेकाळीचे सहकारी असलेले ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्यांना आव्हान दिले असले तरी, गेल्या पंधरा वर्षात कळवा आणि मुंब्र्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जितेंद्र आव्हाड यांचे पारडे जड मानले जात आहे. मनसेकडून ॲड. सुशांत सूर्यराव रिंगणात असले तरी त्यांचा प्रभाव कळव्यातील काही भाग वगळता मुंब्र्यात काहीच नसल्याने या ठिकणी दुरंगी लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
गेल्या विधानसभेला मिळालेली मते
जितेंद्र आव्हाड (शरद पवार राष्ट्रवादी गट ) - 1 लाख 9 हजार
दीपाली सय्यद (शिंदे शिवसेना गट) - 33 हजार 644 तर
अल्तमश फैजी - 30 हजार 543 मतं मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य असलेले जितेंद्र आव्हाड हे 2009 साली पहिल्यांदा कळवा मुंब्र्यातून विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. तोपर्यंत मुंब्रा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. पहिल्याच निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना 61 हजार 510 तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे राजन किणे यांना 45 हजार 821 तर मनसेचे प्रशांत पवार यांना 15 हजार 119 मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत 15 हजार 895 मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या दुसर्या निवडणुकीत आव्हाड यांना 86 हजार 531 त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दशरथ पाटील याना 38 हजार 850, भाजपचे अशोक भोईर यांना 12 हजार 881 तर एमआयएमचे अशरफ मुलांनी यांना 16 हजार 375 मतं मिळाली होती, तेव्हा आव्हाड 47 हजार 683 मतांनी विजयी झाले होते. 2019 साली जितेंद्र आव्हाड यांना 1 लाख 9 हजार 213, शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांना 33 हजार 644 तर आपच्या उमेदवाराला 30 हजार 543 मतं मिळाली होती. त्या निवडणुकीत 75 हजार 634 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे गेल्या तीन टर्मच्या निवडणूकीत जितेंद्र आव्हाड यांचे मताधिक्य कमी न होता ते वाढले आहे. यंदा चवथ्यांदा आव्हाड निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे सहकारी नजीब मुल्ला यांनी त्यांना आव्हान दिले आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्याचमुळे त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती. दुसरीकडे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजितदादा यांच्या सोबत गेल्याने त्यांनाच जितेंद्र आव्हाडांच्या समोर अजितदादांच्या राष्ट्र्वादीने उमेदवारी दिली आहे.
गेल्या 15 वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरात विकासकामे केली आहेत, या मतदारसंघात खड्डे मुक्त रस्त्यांची संकल्पना त्यांनीच राबवली आहे. कळव्यात मिनी स्टेडियम, रुग्णालय, कळव्यात रेल्वे स्टेशन ते सह्याद्री बायपास रस्ता, रेल्वे स्टेशन सुशोभीकरण, वाहनतळ, 90 फिट रोड, रेती बंदर चौपाटी, पटनी ते कोपरी फ्लायओव्हर, सक्षम पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, मुकुंद केणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशी कळव्यातील तसेच पारसिक नगर मधील मोठी विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहे. तर मुंब्रा आणि कौसा भागातही त्यांचा विकासाचा आलेख मोठा आहे. मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसर, मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शन फ्लायओव्हर, मौलाना अब्दुल कलाम आजाद स्टेडियम, ऐरोली काटई भूमिगत मार्ग, स्लॉटर हाऊस, अशी विविध विकासकामे त्यांनी मुंब्र्यात केली आहेत.
जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा विधानसभेचे नेतृत्व करत असले तरी राज्य पातळीवरील प्रश्न नेहमीच मांडत असतात. धर्मनिरपेक्ष नेता म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख असल्याने कळवा आणि मुंब्र्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामानाने नजीब मुल्ला यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला असला तरी कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा त्यांचा पाठीशी अनुभव आहे. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे मानस पुत्र मानले जातात. त्यामुळे स्वतः शरद पवार या मतदार संघावर लक्ष ठेऊन आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे देखील या मतदार संघात आपली ताकद लावतील असा अंदाज आहे. मुस्लिम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांना मतदार संघात उतरवण्यात आले असले तरी गेल्या पंधरा वर्षात मुंब्र्यात आव्हाडांनी निर्माण केलेले ऋणानुबंध भक्कम असल्याने त्याचा अधिक फायदा हा जितेंद्र आव्हाड यांनाच होण्याची जास्त शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कळवा मुंब्र्यातील बहुतांश नगरसेवक हे जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतच आहेत. दुसरीकडे लोकसभेत भाजप कडून अँटी मुस्लिम भूमिका घेतली गेल्याने याचा फटका जसा लोकसभेला बसला तसाच फटका विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बसण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना कळवा मुंब्र्यातून चांगली मते मिळाली होती. दुसरीकडे 2009 साली या मतदारसंघातून मनसेचे प्रशांत पवार यांनी 15 हजार 119 मते मिळाली होती. राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग कळव्यात असून त्यांनी दिलेला उमेदवार सुशांत सूर्यराव किती मतं घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.