शहापुरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भिवंडी प्रांत अधिकारी यांच्या समवेत कसारा भागातील फुगाळे येथील विहीरीतील जलस्रोतांची पहाणी केली.Pudhari News Network
Published on
:
01 Feb 2025, 5:54 am
Updated on
:
01 Feb 2025, 5:54 am
शहापुरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भिवंडी प्रांत अमित सानप, तहसिलदार परमेश्वर कासोळे, सहा.गटविकास अधिकारी आर.बी.भोसले यांनी गुरुवार (दि.30) रोजी कसारा भागातील फुगाळे येथील विहीरीतील जलस्रोतांची पहाणी केली. मात्र अधिकार्यांचा हा दौरा सपशेल कोरडा ठरला. कारण कसारा भागातील फुगाळा, कसारा खुर्द, धामणी, अजनुप यांसारख्या ग्रामपंचायतींनी एक महिन्यापूर्वी टँकरची मागणी करूनही मंजुरी मिळाली नाही. तर पाणी टंचाई आराखडा देखील धुळखात पडला आहे. त्यामुळे हा दौरा केवळ फार्स ठरला आहे.
दरवर्षी प्रमाणे शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्याचे सुरवाती पासुनच पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पंधरा कोटींचा टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असुन त्याला मंजुरी मिळाली नसल्याचे पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जाते. तर चार ग्रामपंचायतीने टँकरची मागणी करूनही मंजुरी मिळाली नसल्याचे कळते.
शहापुर तालुक्यात 110 ग्रामपंचायती असुन प्रत्येक ग्रामपंचायत मिळुन 189 जल जिवन च्या योजना आहेत. परंतु या योजनांच्या कामांची मुदत संपुनही योजना पुर्ण नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. तसेच दोन ते तिन किमी अंतरावरून पायपीट करून महिला भगिनींना रात्री -अपरात्री पाणी आणावे लागते. त्यातच गावातील विहीरी, बोअरवेलच्या पाण्याचा जलस्रोत संपुष्टात आल्याने विहीरी कोरड्या पडल्या आहेत. याचा अर्थ भूगर्भातील पाणी पातळीही खालावली आहे. यावर उपाय म्हणून गेली पाच वर्षा पासुन तालुक्यातील वनविभाग, पंचायत समिती लघुपाटबंधारे विभाग, त्याचप्रमाणे जलसंधारण, तालुका कृषी विभाग यांनी आता पर्यंत करोडो रूपयांचे बंधारे केवळ कागदावरच पुर्ण केले आहेत. प्रत्यक्षात रात्री च्या वेळेस दगड व मातीची भर टाकुन बनविलेले हे बंधारे केव्हाच नेस्तनाबूत झाले आहेत. तर एकाही बंधार्यात थेंबभर देखील पाणीसाठा असल्याचे पाहायला मिळत नाही. याकरीता या बोगस बंधार्यांचे कामामुळे ना भूगर्भातील पाणी पातळी वाढली, ना मानव अथवा वन्यजीवांना या पाण्याचा उपयोग झाला.
भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी
यावर्षी देखील जलसंधारण, पंचायत समिती लघुपाटबंधारे विभागाने करोडो रूपयांचे बंधार्यांचे कामांचा आराखडा तयार केला आहे. तसेच या बंधार्यांचे मोजमाप, प्रस्तावित जागा, यांची स्थळ पहाणी तसेच फोटो पंचनामा करने तितकेच महत्वाचे आहे. तालुक्यातील बापरे, कोथळा -कळभोंडे, ढाढरे ग्रां.प., गुंडे, डेहणे, चोंढे, धसई अशा वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या कामांची काटेकोरपणे सखोल चौकशी करने उचित ठरणार आहे. पाण्यासारखा पवित्र कामामध्ये भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांचेवर खातेनिहाय कारवाई व्हावी अशी येथील नागरिकांचे म्हणने आहे.