Published on
:
29 Nov 2024, 3:03 pm
Updated on
:
29 Nov 2024, 3:03 pm
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश व विद्यमान विश्वविजेता डिंग लिरेन यांच्यातील विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील चौथी फेरी 42 व्या चालीअखेर बरोबरीत सुटली. दोन्ही ग्रँडमास्टर्सनी धोके टाळण्यावर भर दिला. यामुळे, ही लढत बरोबरीत सुटणार, हे त्यापूर्वीच निश्चित झाले. 14 क्लासिक डावात खेळवल्या जाणार्या या चॅम्पियनशिपमध्ये सर्वप्रथम साडेसात गुण संपादन करणारा ग्रँडमास्टर नवा विश्वविजेता ठरणार आहे.
शुक्रवारी या स्पर्धेतील चौथ्या फेरीत काळ्या मोहर्यांनी खेळत असलेल्या डी. गुकेशने येथे सावध पवित्र्यावर खेळणे अधिक पसंत केले. डावाच्या मधल्या टप्यात मी थोडे आक्रमण करु शकलो असतो. पण, आणखी बरेच डाव बाकी आहेत. त्यामुळे धोके घेणे टाळले, अशी प्रतिक्रिया लिरेनने दिली. तिसर्या डावातील पराभवानंतर सावरण्यासाठी माझ्याकडे विश्रांतीचा दिवस होता. त्याचा मला फायदा झाला, असेही त्याने येथे नमूद केले.
या स्पर्धेत क्लासिकल टाईम कंट्रोलमधील आणखी दहा डाव बाकी असून आता पाचव्या फेरीत गुकेशकडे पांढर्या मोहर्यांनी खेळण्याची संधी असणार आहे. शुक्रवारी येथील चौथ्या फेरीत लिरेनने बर्डस ओपनिंगचा अवलंब केला. वजीराच्या बाजूकडील उंट डावाच्या पहिल्याच टप्यात बाहेर काढल्याने लिरेन येथे गुकेशची त्याच्या तयारीऐवजी त्याच्या कौशल्याचा कस पाहणे पसंत करेल, याचा दाखला मिळाला. गुकेशने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि समान ताकदीच्या मोहर्यांची अदलाबदल होत राहिल्यानंतर ही लढत ड्रॉ राहणार, हे साहजिकच होते.
उभय ग्रँडमास्टर्सच्या निर्णायक टप्यात रुक-पॉन एण्डगेममध्ये पोहोचले आणि त्यानंतर उभयतात एका गुणाची विभागणी होणे ही औपचारिकता होती. भारतातर्फे आजवर केवळ विश्वनाथन आनंदलाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. आनंदने आपल्या कारकिर्दीत पाचवेळा या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. शुक्रवारी आनंदनेच येथे गुकेशतर्फे पहिली सेरेमोनियल चाल खेळत या डावाची सुरुवात केली.