Published on
:
27 Jan 2025, 5:06 am
Updated on
:
27 Jan 2025, 5:06 am
कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा
अंबप (ता. हातकणंगले) येथील महिलांनी अनिष्ट विधवा प्रथेला तिलांजली देत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिप्ती माने होत्या.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (दि.२६) सकाळी ध्वजावंदन झाल्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायतच्या पटांगणात घेण्यात आली. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध विषय मंजूर झाल्यानंतर अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सरपंच दीप्ती माने यांनी मांडला. याला उपस्थित महिलांनी हात वर करून अनुमती दर्शविली. यावेळी विषय पटलावरील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. उपस्थित प्रश्नांना सरपंच दीप्ती माने यांनी उत्तरे दिली. ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही.शिंदे यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
यावेळी उपसरपंच असिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, नागरीक उपस्थित होते. ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदीकुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.
ग्रामसभेमध्ये पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. गावामध्ये विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
सरपंच दिप्ती माने