अकोला: मुख्याध्यापिकेविरूद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. file photo
Published on
:
20 Nov 2024, 8:14 am
Updated on
:
20 Nov 2024, 8:14 am
अकोला, पुढारी वृत्तसेवा : मतदान केंद्राच्या कक्षाचा ताबा देण्यात दिरंगाई केल्यावरून गुरूनानक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेविरूद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पी. झेड. भोसले यांनी याबाबत तक्रार दाखल केली.
निवडणूकविषयक कामकाजात कुठलीही बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गुरुनानक विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदान पथक पोहोचले असताना मतदान केंद्राला कुलुप असल्याचे आढळून आले. याबाबत निवडणूक निर्णय अधिका-यांनी तत्काळ स्वतः मुख्याध्यापिकेशी मोबाईलवर संपर्क साधला. तथापि, गुरुनानक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमा शुक्ला व कर्मचारी पंचशील गजघाटे यांनी मतदान केंद्राचे कुलूप उघडण्यास नकार दिला.
त्याचप्रमाणे, यापूर्वीही शाळेतील मतदान केंद्रासाठी आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुचित करण्यात आले असतानाही मुख्याध्यापिका यांनी कार्यवाही केली नाही. शाळेतील स्वच्छतागृह बंद स्थितीत असल्याचे आढळले. मतदान कक्षाला कुलूप असल्याने शाळेत गेलेल्या मतदान कर्मचा-यांना ताटकळत रहावे लागले. मतदान केंद्राचा कायदेशीर ताबा घेईपर्यंत निवडणूकविषयक कामात दिरंगाई झाली असून निवडणूक निर्णय अधिका-यांच्या आदेशाची अवहेलना केल्यावरून मुख्याध्यापिकेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली. भारतीय न्याय संहिता 223 व लोकप्रतिनिधी अधिनियमातील मतदान केंद्रावरील गैरवर्तणुकीबद्दल कलम 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यालयातील कक्षाचा ताबा घेऊन मतदान केंद्राचे काम सुरळीत व सुसज्ज करण्यात आले असून, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.