Published on
:
19 Nov 2024, 11:40 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:40 pm
आली रे आली, मतदानाची वेळ आली. आज आपल्याला महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करायचे आहे. गेले तीन महिने प्रचार सभा आणि इतर माध्यमातून विविध राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका तुमच्या समोर ठेवली आहे. एवढा मोठा गदारोळ होऊन शेवटी आज मतदानाचा दिवस उजाडला. मंडळी, किती वाजता मतदान करायचे याची नियोजन केलेत की नाही? नसेल केले तर आत्ताच करा आणि आज मतदान करा, ही आग्रहाची विनंती आहे. मतदान हा आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि आपण तो बजावलाच पाहिजे. हा अधिकारही आहे आणि हे कर्तव्यही आहे. चला तर मग, पटकन आपले मतदार कार्ड किंवा ओळखपत्र तयार ठेवा. अजूनही आपले मतदान कोणत्या बूथवर आहे हे माहीत नसेल तर तत्काळ माहीत करून घ्या आणि आज मतदान कराच. कारण प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.
तुम्ही कुणाला मतदान केले पाहिजे हा तुमचा अधिकार आहे. पण जरूर मतदान करा. तुमच्या आवडीचे सरकार आणण्याची संधी तुम्हाला घटनेने उपलब्ध करून दिली आहे. तिचा पुरेपूर वापर करा. ताई, माई, अक्का कुठे ना कुठेतरी मारा शिक्का. पूर्वी शिक्का मारावा लागत असे. आता बटण दाबायला लागते. मतदान केंद्रावर गेल्यानंतर अजिबात गडबडून जाऊ नका. घाईघाईत मतदान करू नका. तुमचे मतदान पूर्ण झाले आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच बूथच्या बाहेर पडा. निवडणूक आयोगाचे कर्मचारी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करायला तयार असतात.
तुम्ही - आम्ही सामान्य जनता इतकी वर्षे कुठलीही शंका मनात न आणता मतदान करत आहोत. आज दिवसभरात तुमचा नाश्ता, जेवण, चहापाणी इत्यादींमधून थोडासा वेळ काढून मतदानाला जाऊन या, असा आमचा आग्रह आहे. आपण मतदान करत नसू आणि नंतर निवडून आलेल्या सरकारबद्दल तक्रारी करत असू तर त्याला काही अर्थ नसतो. त्यापेक्षा मतपेटीमधून आपला हक्क आपण बजावला पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तसे सरकार निवडून आणले पाहिजे. विधानसभेचा एक आमदार तुम्ही निवडत आहात. असे 288 आमदार एकत्र येऊन नंतर कुणाचे सरकार येणार हे ठरणार आहे. पक्ष, पक्षाची विचारधारा, याचबरोबर उमेदवाराचे चरित्र आणि चारित्र्य, त्याची जनसेवेची आसक्ती हे सर्व लक्षात घेऊन मतदान करा. तुम्ही मतदान केलेला उमेदवार निवडून येणार की नाही हे तुम्हालाही माहीत नसते. पण मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र अजिबात विसरू नका. राजकीयद़ृष्ट्या आपण मराठी माणसे अत्यंत सजग असतो. राजकारणात कोण चांगले कोण वाईट आणि कुठे काय चालले आहे याची आपल्याला इत्थंभूत माहिती असते. पण नेमके मतदान करायच्या दिवशी आपण पिकनिकला केव्हा तीर्थक्षेत्रावर जातो. मंडळी, एक लक्षात ठेवा. तुमचे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि तुम्ही मतदान केलेच पाहिजे. जागृत लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अधिकाधिक होणारे मतदान होय. मतदानाच्या दिवशी कुठे लग्न लावायला जायचे असेल किंवा अगदी फिरायला जायचे असेल तर सकाळी सात वाजताच मतदान करून तुम्ही जाऊ शकता. आज मात्र शंभर कामे सोडा. पण मतदान कराच, अशी आमची आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे.