अमेरिकेने उद्योजक गौतम अदानी यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल केले असून त्यांच्या अमेरिकेत प्रत्यार्पणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अदानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. हिंदुस्थानात सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली अमेरिकेतील गुंतवणूकदारांकडून तब्बल 25 हजार कोटी रुपये उकळले. तसेच सोलर एनर्जीचे पंत्राट मिळविण्यासाठी हिंदुस्थानातील सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार 236 कोटींची लाच दिल्याचा ठपका अमेरिकेतील कोर्टाने अदानींवर ठेवला आहे. आज अदानींवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
अमेरिकेतील वकील ब्रायन पीस यांच्याकडे अदानी आणि सात अन्य आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे व ते जिथे राहातात तिकडे पाठविण्याचे अधिकार असल्याचे हिंदुस्थानी-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी म्हटले आहे. जर हिंदुस्थानप्रमाणे अमेरिकेकडेही प्रत्यार्पण करार असेल, तर दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय करारानुसार संबंधित व्यक्तीचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करावे लागेल. ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेचे हिंदुस्थानला पालन करावे लागेल. हिंदुस्थान आणि अमेरिकेत प्रत्यार्पण करारावर 1997 मध्येच स्वाक्षऱया झाल्या आहेत, असेही रवी बत्रा यांनी स्पष्ट केले. दरम्यान अमेरिकेतील वकील पीस यांनी 62 वर्षीय अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर तसेच माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्याविरोधात पाच प्रकरणांत खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
अदानी ग्रुपला शेअर बाजारात 38 हजार कोटींचा दणका
अदानी समूहाच्या पंत्राट घोटाळय़ाने शेअर बाजारात सलग दुसऱया दिवशीही भूपंप घडवला. आज समूहाच्या पंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य तब्बल 38 हजार कोटींनी घसरले. आज बाजार उघडताच अदानी समूहातील पंपन्यांचे शेअर्स 11 टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 5 टक्क्यांहून घसरून 1055.40 वर आला, तर पंपनीचा शेअर 1020.85 रुपयांवर पोहोचला. अदानी ग्रीन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 8 टक्क्यांवरून घसरून 628 रुपयांवर आला. अदानी पॉवरचा शेअर 4 टक्क्यांनी घसरून 445.75 रुपयांवर आला. दरम्यान अदानी टोटल गॅसचा शेअर 3 टक्क्यांनी घसरला. दरम्यान दुपारी 12 वाजल्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी पॉवर हे शेअर्स सोडून सर्व शेअर्स हिरव्या रंगात दिसत होते.
संसद अधिवेशनात अदानींचा मुद्दा उचलून धरणार
अदानींविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून उद्योजक अदानी यांना मोदी सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच अदानींविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी खरगे यांनी पेंद्र सरकारकडे केली असून अदानींच्या लाचखोरीचा मुद्दा आगामी संसद अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे म्हटले आहे. सरकारला सर्वकाही माहीत आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ अदानींविरोधात पावले उचलायला हवीत, असेही ते म्हणाले. दरम्यान अदानींना अटक करण्याची राहुल गांधी यांची मागणी योग्यच असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.