अनिल देशमुखांनी हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. file photo
Published on
:
19 Nov 2024, 1:04 pm
Updated on
:
19 Nov 2024, 1:04 pm
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मी मरणार नाही, आणि हल्ला करणाऱ्यांना सोडणारही नाही, असा सज्जड इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. आपल्याला दगड मारा अथवा गोळ्या मारा, तरी मी मरणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही, असेही देशमुख म्हणाले.
गेले काही दिवस देशमुख विरुद्ध फडणवीस असा माजी, आजी गृहमंत्र्यांचा संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. नागपुरातील कोराडी रोडवरील खासगी रुग्णालयातून मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
सोमवारी निवडणूक प्रचार तोफा शांत झाल्यानंतर नरखेड येथून ते काटोलच्या दिशेने परतत असताना त्यांच्या कारवर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला, मानेला दुखापत झाली. त्यांना सुरुवातीला काटोल येथे व नंतर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस यंत्रणा तपासात गुंतली असून चार अज्ञात इसमांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यासोबतच राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप होत आहेत. दुसरीकडे सायंकाळपर्यंत या घटने संदर्भात पोलीस अधिक माहिती देण्याची शक्यता आहे.