अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याने प्रेयसीची केली हत्या..!Pudhari News Network
Published on
:
01 Feb 2025, 6:01 am
Updated on
:
01 Feb 2025, 6:01 am
पनवेल : विक्रम बाबर
प्रेयसीचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून २२ वर्षीय प्रेयसीवर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेल सेक्टर १८ मध्ये घडल्याचे समोर आली आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर वार करून स्वतःला देखील संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात आरोपी प्रियकरा विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, जागृती हरेश सत्वे (वय २२) राहणार नवीन पनवेल सेक्टर १८ असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. जागृती ही तिच्या कुटुंबासोबत नवीन पनवेल सेक्टर १८ येथे राहत होती. जागृती हिचे निलेश सुधाकर शिंदे (वय २५) राहणार देवगाव ठाणा याच्या सोबत प्रेमसंबंध होते. गेल्या तीन महिन्यापूर्वी दोघांच्या प्रेमसबधात तणाव निर्माण झाला होता. त्यांचा ब्रेकअप देखील झाला होता. मात्र या नंतर देखील दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसबध असल्याचा संशय निलेश याच्या डोक्यात वारंवार येत होता. या गोष्टीचा राग मनात धरून निलेशने ३१ जानेवारी रोजी प्रेयसीचे घर गाठले आणि जागृतीला शिवीगाळ करत तू दुसऱ्यासोबत प्रेमसबध ठेवू नको असे बोलून तिला मारहाण केली.
त्या नंतर संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी जावून जागृतीला मारहाण करत तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिला ठार केले. त्या नंतर निलेशने स्वतःला देखील संपवण्यासाठी स्वतःवर देखील वार केले. या वेळी जागृतीची आई आणि बहीण ही घरी होती. अतिरक्तस्राव झाल्याने जागृती जागेवर मृत पावली आणि निलेशला उपचारासाठी कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.