अमरावती हादरली : निर्घुण खून करून शीर केलं धडा वेगळं File Photo
Published on
:
29 Nov 2024, 5:03 am
Updated on
:
29 Nov 2024, 5:03 am
अमरावती, पुढारी वृत्तसेवा
शहरातील म्हाडा कॉलनी-अकोली परिसरात स्मशानभूमी जवळ 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. घटनास्थळी शिर धडापासून वेगळं केलेला अज्ञात मृतदेह आढळला आहे. दरम्यान मृतदेहाचे शीर आढळून आले नाही. त्यामुळे त्याची हत्या करून शीर (मुंडके) अन्यत्र फेकण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने भरलेला सत्तूर आणि काही अंतरावर एक चप्पल जप्त केली आहे. मृतदेहावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा आढळला आहे.
गुरुवारी काही नागरिक या मार्गावरून जात असताना त्यांना हा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर पथकासह दाखल झाले. डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पोलीस यंत्रणा मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ही हत्या का झाली आणि आरोपी कोण आहेत याचा पुढील तपास होणार आहे. दरम्यान या हत्येमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.