Published on
:
23 Nov 2024, 3:17 pm
Updated on
:
23 Nov 2024, 3:17 pm
अमरावती : जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीने विजय मिळविला असून केवळ एका ठिकाणी महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. त्यातही भाजपने पाच जागा काबीज करत अमरावतीत जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस एकही जागा मिळविण्यात यशस्वी ठरली नाही तर शिवसेना ठाकरे गटा ने दर्यापुरातून खाते उघडले आहे.
शनिवारी (दि.23) जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालात अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके विजयी ठरल्या. तर बडनेरा मतदार संघात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांनी आपला गड कायम राखला. दर्यापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे गजानन लेवटे यांनी विजय संपादन केला. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत असलेल्या मोर्शी मतदारसंघात भाजपचे उमेश यावलकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. आदिवासी बहुल मेळघाट मतदार संघात आश्चर्यकारक निकाल लागला असून येथून भाजपचे केवलराम काळे विक्रमी मतांनी निवडून आले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या तिवसा मतदार संघात भाजपचे राजेश वानखडे यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीपासून भाजपचा गड असलेल्या धामणगाव रेल्वेत प्रताप अडसड यांनी पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून वर्चस्व कायम ठेवले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अचलपूर मतदारसंघातून प्रहार चे बच्चू कडू यांचा भाजप उमेदवार प्रवीण तायडे यांनी पराभव केला आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभा संजय खोडके 60087 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांचा 5413 मतांनी पराभव केला. देशमुख यांना 54,674 मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर आझाद समाज पक्षाचे अलिम पटेल यांना 54 हजार 591 एवढे विक्रमी मतदान झाले.
बडनेरा मतदारसंघात महायुती युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल 1,27,800 मते घेत रवी राणा यांनी गड कायम राखला आहे. तर महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळालेले शिवसेना ठाकरे गटाचे सुनील खराटे यांना केवळ 7121 मते मिळाली. यासह ठाकरे गटाच्या बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांना 60,826 मते मिळाली, त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.मोर्शी विधानसभा मतदारसंघात एकतर्फी झालेल्या लढतीत भाजप चे चंदू यावलकर यांनी किल्ला काबिज केला आहे. उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना मात देत, 64 हजार 988 मतांनी विजय मिळविला. या लढतीत भाजपचे चंदू यावलकर यांना 99 हजार 683 इतके मते मिळाली तर राकाँ अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना 34 हजार 695, राकाँ शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांना 31 हजार 843 व अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांना 26 हजार 729 इतक्या मतावर समाधान मानावे लागले. येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होती,हे विशेष.
तिवसा विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार राजेश वानखडे यांनी 7617 मतांनी त्यांचा पराभव केला. राजेश वानखडे यांना 99,664 मतं मिळाली. तर ठाकूर यांना 92,047 मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकाची 6710 मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलिंद तायडे यांनी घेतली. तर बसप उमेदवार डॉ. मिलिंद ढोणे हे 1073 मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष असेल्या अचलपूरमधून भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा 12 हजार 131 मतांनी पराभव केला. तायडे यांना 78 हजार 201 तर कडू यांना 66 हजार 70 मते प्राप्त झाली. काँग्रेसचे बबलू देशमुख यांना तिसऱ्या क्रमांकाची 62 हजार 791 मते मिळाली.
मेळघाट मतदारसंघात लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासी बहुल भागातील मतदारांनी भाजप उमेदवार केवलराम काळे यांना भरघोस प्रतिसाद देत तब्बल 1 लाख 45 हजार 978 मतांनी निवडणूक दिले. आतापर्यंतच्या सर्व निवडणूक निकालाचे रेकॉर्ड केवलराम काळे यांनी तोडले आहे. काँग्रेसचे डॉ.हेमंत चिमोटे यांना 39 हजार 119 मते मिळाली.प्रहार चे उमेदवार राजकुमार पटेल यांना केवळ 25 हजार 281 मते मिळाली. दर्यापुर मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गजानन लवटे हे 87 हजार 749 मतांनी निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा त्यांना 19709 मते अधीक मिळाली. युवा स्वा भिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांना 68 हजार 40 मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांना केवळ 23 हजार 632 मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट लढतीत आमने-सामने होते.
धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप अडसड यांनी सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली आहे. अडसड यांनी 1 लाख 10 हजार 641 मतं घेत विजय मिळविला. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा त्यांना 16228 मते अधिक मिळाली. काँग्रेस उमेदवार प्रा.विरेंद्र जगताप यांना 94 हजार 413 मतांवरच थांबावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी 9784 मतं घेतली.