Published on
:
30 Nov 2024, 12:09 pm
Updated on
:
30 Nov 2024, 12:09 pm
अमरावती : अमरावतीत बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेलोरा गावाजवळ नाल्यात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मानवी सांगाड्यावरून मृताची ओळख पटू शकली नाही. मृताची ओळख पटविण्यासाठी बडनेरा पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की २९ नोव्हेबर रोजी सकाळी बेलोरा परिसरातील काही नागरिक बैलाच्या शोधात फिरत होते. दरम्यान त्यांना परिसरातील नाल्याच्या झुडुपात मानवी सांगाडा असल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती इतरांना दिली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
त्यानंतर आजूबाजुला असणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यात आली. मात्र तरी देखील मृतांची ओळख पटली नाही. शवविच्छेदनाच्या अनुषंगाने मानवी सांगाड्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन गृहात ठेवले आहे. पुढील तपास बडनेरा पोलिस करीत आहेत. मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. मृताच्या अंगावर हाफ पँट आणि पिवळा टी-शर्ट आढळून आला आहे. पोलीस सर्व बाजूने या घटनेचा तपास करत आहे. हा मानवी सांगाडा दोन ते तीन महिन्यांपासून घटनास्थळी पडून असल्याचे बोलले जात आहे.