Published on
:
18 Nov 2024, 11:48 pm
वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासी आहेत की नाही हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांची अंतराळयाने समजली जाणारी ‘युफो’ (अनआयंडेटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस् किंवा मराठीत ‘उडत्या तबकड्या’) पाहिल्याचे अनेक दावे जगभरातून झालेले आहेत. अमेरिकन सरकारला अशा‘युफो’ मधून आलेल्या एलियन्सची माहिती आहे. एलियनबाबतची माहिती अमेरिका दडवते, असेही दावे आजपर्यंत अनेकांनी केलेले आहेत. आताही डॅनी शीहान नावाच्या एका अमेरिकन व्यक्तीने असाच दावा केला आहे. अमेरिकन सरकार एलियनच्या संपर्कात असल्याचे त्याने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर एलियन पृथ्वीवरही राहत असल्याचे त्याने म्हटले आहे.
एलियन्सबद्दल तुम्हा-आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. एलियन्सच्या अस्तित्वावरून संशोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आजपर्यंत कोणीही एलियनचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करू शकलेले नाही. आता मात्र, एलियनच्या अस्तित्वाबाबत सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. एलियन अमेरिकेच्या संपर्कात असून एलियनच्या अस्तित्वाबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. पृथ्वीवर एलियन राहत असून समुद्रात 100 वेळा ‘युफो’चे लँडिग पाहण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनेच हा दावा केला आहे. डॅनी शीहान असे या व्यक्तीचे नाव आहे. डॅनी शीहान हा यूएफओ व्हिसलब्लोअर्सशी संबंधित आहे. यूएफओ व्हिसलब्लोअर्सच्या युनाइटेड स्टेटस् काँग्रेस परिषदेत डॅनी शीहान सहभागी होणार आहेत. त्याआधीच डॅनी शीहान यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. अमेरिकेत समुद्राच्या तळाशी एक गुप्त बेस कॅम्प तयार करण्यात आला आहे. अमेरिका सरकार या गुप्त बेस कॅम्पच्या मदतीने ‘युफो’ तसेच एलियनच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. समुद्राच्या तळाशी एलियन राहात असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. इतकेच नाही तर डॅनी शीहान यांनी याचे लोकशन देखील सांगितले आहे. न्यू पॅराडाइम इन्स्टिट्यूटच्या सादरीकरणात डॅनी शीहान यांनी एलियनच्या वास्तवाबाबात अनेक स्फोटक खुलासे केले आहेत. यूएसएस निमित्झ बॅटल ग्रुपशी संलग्न पाणबुडीच्या माध्यमातून युफो तसेच एलियनच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. अमेरिकेतील साइट ग्वाडालूपजवळ तसेच लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेस समुद्राच्या तळाशी एलियनचे वास्तव्य आहे. या ठिकाणी समुद्रात 100 पेक्षा अधिक वेळा युफोचे लँडिंग झाले असल्याचा दावा डॅनी शीहान यांनी केला आहे. येथे अनेक प्रकारचे दुर्लभ जीव आढळून आले असून अशा प्रकारचे जीव पृथ्वीवर इतर कुठेच आढळून आलेले नाहीत.