Published on
:
23 Nov 2024, 1:40 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:40 pm
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये महायुतीचे, तर एका मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. अहेरी विधानसभा क्षेत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम, तर गडचिरोलीतून भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे विजयी झाले. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसचे रामदास मसराम यांनी भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना पराभूत केले.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे हे १५ हजार ५०५ मतांनी विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांचा पराभव केला. डॉ.नरोटे यांना १ लाख १६ हजार ५४० मते मिळाली, तर मनोहर पोरेटी यांना १ लाख १ हजार ३५ मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री वेळदा ३३६२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्या खालोखाल बहुजन समाज पार्टीचे संजय कुमरे यांना ३२४१ मते मिळाली. नोटाला २८१७ मते मिळाली.
आरमोरी मतदारसंघात काँग्रेसचे रामदास मसराम यांनी ६२१० मतांनी भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांचा पराभव केला. रामदास मसराम यांना ९८ हजार ५०९, तर कृष्णा गजबे यांना ९२ हजार २९९ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे अनिल केरामी हे ३४३८ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम आणि डॉ.शिलू चिमूरकर यांनी बंडखोरी केली होती. परंतु त्यांचा प्रभाव निष्प्रभ ठरला. गेडाम यांना १९५४, तर डॉ.शिलू चिमूरकर यांना ८५४ मते मिळाली. त्या खालोखाल आझाद समाज पार्टीचे(कांशिराम) चेतन काटेंगे यांना १९२७ आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन पुराम यांना १८०८ मते मिळाली. ‘नोटा’ला १७६२ मते मिळाली.
अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी माजी मंत्री आणि अपक्ष उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांचा १६ हजार ८१४ मतांनी पराभव केला. धर्मरावबाबा आत्राम यांना ५४ हजार २०६ मते मिळाली. त्या खालोखाल अपक्ष उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांना ३७ हजार ३९२ मते मिळाली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भाग्यश्री आत्राम ह्या ३५ हजार ७६५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हनुमंतू मडावी यांनी २७ हजार १८८ मते घेऊन चौथे स्थान प्राप्त केले. ‘नोटा’ ५८२५ मते घेऊन पाचव्या स्थानी राहिला.