महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात नणंद भावजय यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये काका विरोधात पुतण्या लढत झाली. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली. या सर्व नात्यांमधील चर्चेच्या विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघातील लढत चर्चेत होती. या ठिकाणी बाप विरुद्ध बेटी अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यानंतर बाप बाप होता है…अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.
धर्मराव आत्राम यांच्याकडून जल्लोष
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते. त्यांनी पहिली प्रतिक्रिया टीव्ही ९ मराठीला दिली. ते म्हणाले, बाप बाप होता है…माझा विजय माझ्या निश्चित होता, अशी प्रतिक्रिया आत्राम यांनी दिली.
असा आला निकाल
2019च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. आता त्यांना 53978 मते मिळाली. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37121 मते घेतली.
हे सुद्धा वाचा
दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकाच कुटुंबातील असणाऱ्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक नाट्य झाली होती. धर्मराबाबा यांनी मुलीवर अनेक आरोपही केले होते.