स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, असं या मालिकेचं नाव आहे. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे राहतात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अश्याच एका जोडप्याभोवती फिरते, ज्यांना खरंतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे, मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात.
दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना निवेदिता सराफ म्हणाल्या, “आमच्या वयाच्या नटांची नेहमी एक खंत असते की आता आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. मात्र तरीही आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये न अडकता आपल्यासाठीही मध्यवर्ती भूमिका लिहिली जावी. टीव्ही माध्यमाची मी आभारी आहे की आम्हाला मध्यवर्ती घेऊन भूमिका लिहिल्या जात आहेत. या मालिकेतलं सुधा हे पात्र मला खूपच भावलं. ‘माझ्यासोबत आता तू देखिल संसारातून रिटायर हो’ हे नवऱ्याचं म्हणणं तिला पटतं, मात्र तिचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. घर-संसारात तिचा जीव अडकला आहे. प्रत्येक गृहिणीला आपलंसं वाटेल असं हे पात्र आहे.”
हे सुद्धा वाचा
अभिनेते मंगेश कदम म्हणाले, “मालिकेचा विषय आपल्या खूप जवळचा आहे. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. यशवंतचं देखिल असंच एक स्वप्न आहे. कोकणातल्या घरी आपल्या पत्नीसोबत निवांत आयुष्य जगायचं असं त्याने मनाशी ठरवलेलं आहे. यशवंतप्रमाणे जवळपास प्रत्येकाचंच हे स्वप्न असतं. मात्र आई-बाबा आपल्या जबाबदारीमधून कधीही रिटायर होत नाहीत. नात्यांची उत्तम गुंफण असणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन येतोय याचा खूप आनंद आहे.”
या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “आई आणि वडील हे आपले दैवत असतात आणि ही मालिका त्यांना आणि त्यांच्या निःस्वार्थपणाला अर्पण आहे. जे बोट धरून आपण चालतो, जी पावलं आपल्याला बळ देतात ती सुद्धा कधीतरी थकतील, त्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीतून कधी तरी मुक्तता मिळायला हवी. त्यांना सुद्धा जाणीव करून देणं फार महत्वाचं असतं की आता आराम करा. मुलं, सुना, जावई, नातवंडं अशी अनेक नाती उलगडत जाणारी गोष्ट आणि आई-वडील त्यांची भूमिका कशी शेवटपर्यंत ठामपणे आणि प्रामाणिकपणे बजावतात हे अधोरेखित करणारी ही मालिका आहे.” ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका येत्या 2 डिसेंबरपासून दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.