महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
Published on
:
23 Nov 2024, 11:02 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:02 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांवर महायुतीने बहुतांश जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने आज (दि.२३) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आम्ही काय नेमकं काय केलं?...' असे म्हणत विधानसभा निवडणुकीतील विजयाचे गमकच सांगितले.
आम्ही काय नेमकं काय केलं; अजित पवार
लोकसभेत मोठे अपयश, मान्य केलं, त्यामधून सावरून आम्ही विचारमंथन केले. त्यानंतर अर्थसंकल्पात विविध विकासाच्या योजनांच्या घोषणा केल्या. राज्य सरकारची लाडकी बहीण ही योजना अधिक प्रभावी ठरली. मी राजकारणात आल्यापासून असे यश पाहिले नाही. प्रसंगी विरोधकांनी योजनांवरून आमची चेष्टा केली; पण हीच योजना गेमचेंजर ठरली. जनतेने विकासाला मत दिले. लोकसभेला निकाल बरोबर तर विधानसभा निवडणुकीत EVM ला दोष असं कसं चालेल, असा सवालही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.
जनतेसमोर नतमस्तक ! - देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १३० जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीला देखील स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी नतमस्तक आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीस यांनी दिली.
राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजना यशाचे गमक; मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जनतेनेच स्वत:च्या हातात घेतली. हा विजय ऐतिहासिक आहे. जनतेने प्रेमाने मतांचा वर्षाव महायुतीवर केला आहे. आम्ही जे काम केले. कामाला प्राथमिकता दिली आणि विकास कामाला प्राधान्य दिले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे आमचे ध्येय. राज्यांचा विकास आणि महिला, शेतकरी आणि युवकांसाठी कल्याणकारी योजना हे या यशाचे गमक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासन आपल्या दारी या योजना देखील प्रभावी ठरल्याचे शिंदे म्हणाले. विरोधक सावत्र भाऊ आमच्या योजनांमध्ये अडथळा आणणार याची आम्हला कल्पना होती. त्यामुळे आम्ही लाडकी बहिण योजनेचे पैसे आधिक बहिणींच्या खात्यात जमा केले. महायुती सरकार घेणारं नाही, तर देणारं यावर लोकांचा विश्वास असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधकांवर टीका करताना लोकांनी सुडाचं, द्वेषाचं राजकारण फेटाळल्याचेही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.