Published on
:
29 Nov 2024, 3:24 pm
Updated on
:
29 Nov 2024, 3:24 pm
ख्राईस्टचर्च, वृत्तसंस्था : हॅरी ब्रूकने 163 चेंडूंत नाबाद 132 धावांची शानदार खेळी साकारल्यानंतर इंग्लंडने येथील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध दुसर्या दिवसअखेर 5 बाद 319 धावांपर्यंत मजल मारली. या लढतीत न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 348 धावा केल्या असून तूर्तास इंग्लंडचा संघ 29 धावांनी पिछाडीवर आहे.
झॅक क्राऊली खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्याने पाहुण्या इंग्लंडची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर तिसर्या स्थानावरील जेकब बेथेल व जो रुट हे देखील स्वस्तात बाद झाल्याने या संघाची अवस्था एकवेळ 3 बाद 45 अशी दाणादाण उडाली. मात्र, ब्रूकने एक बाजू लावून धरत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हॅरी ब्रूकने 163 चेंडूंचा सामना करताना 132 धावा साकारल्या आणि याच धावसंख्येवर तो नाबाद देखील राहिला. त्याच्या या तडफदार खेळीत 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला.
दुसर्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी बेन स्टोक्स 37 धावांवर नाबाद होता. किवीज संघातर्फे नॅथन स्मिथने 86 धावांत 2 तर टीम साऊदी, मॅट हेन्री व विल राउर्के यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. या लढतीत न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 348 धावांचा डोंगर रचला, त्यावेळी केन विल्यमसनने सर्वाधिक 93 धावांचे योगदान दिले होते. त्याच्या 197 चेंडूंतील खेळीत 10 चौकारांचा समावेश राहिला होता.
न्यूझीलंड पहिला डाव : 91 षटकांत सर्वबाद 348 (विल्यमसन 93, फिलिप्स नाबाद 58. अवांतर 42. कहार्स व बशीर प्रत्येकी 4 बळी). इंग्लंड पहिला डाव : 74 षटकांत 5 बाद 319. (हॅरी ब्रूक 163 चेंडूंत नाबाद 132, बेन डकेट 46, बेन स्टोक्स नाबाद 37. नॅथन स्मिथ 2-86)
‘सुपरमॅन’ फिलिप्सने हवेत झेपावत टिपला अनपेक्षित झेल
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या बळावर या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ब्रुक आणि पोप किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत असताना पोपने 77 धावांवर असताना आक्रमक फटका लगावला. मात्र, यावेळी नामी संधी लाभलेल्या फिलिप्सने पूर्णपणे हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला आणि यामुळे पोपची खेळी संपुष्टात आली. फिलिप्सने घेतलेल्या या अफलातून झेलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.