Published on
:
19 Nov 2024, 11:32 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:32 pm
गोव्यात आज 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) सुरुवात होत असून हा सोहळा तरुण चित्रपट निर्माते, हेच भविष्य आहे या संकल्पनेवर अधिक भर असणारा आहे. या आठ दिवसांच्या काळात इफ्फीमध्ये शेकडो चित्रपट सादर होतील. जागतिक चित्रपटांतील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव केला जाईल. जागतिक आणि भारतातील चित्रपटीय उत्कृष्टतेचा हा संगम, नवोन्मेष, रोजगार आणि सांस्कृतिक राजनैतिकतेचे ऊर्जाकेंद्र या रूपात भारतातील सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेला अधोरेखित करत आहे.
भारतातील सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्था स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे अडीच टक्क्यांचे योगदान देत 30 अब्ज डॉलर्स मूल्याच्या उद्योगाच्या रूपात उदयाला आली असून देशातील एकूण कार्यबळाच्या 8 टक्के भागाला रोजगार देत आहे. चित्रपट, गेमिंग, अॅनिमेशन, संगीत, इन्फ्ल्यूएन्सर मार्केटिंग आणि अशा अनेक रूपांमध्ये कार्यरत असलेले हे उद्योग क्षेत्र भारताच्या सांस्कृतिक परिद़ृश्यातील चैतन्याचे दर्शन घडवते. सुमारे 3.375 कोटी रुपयांची उलाढाल असलेले इन्फ्ल्यूएन्सर मार्केटिंग क्षेत्र आणि दोन लाख पूर्णवेळ आशय निर्मात्यांसह हा उद्योग म्हणजे भारताच्या जागतिक आकांक्षांची प्रेरक शक्ती आहे. गुवाहाटी, कोची आणि इंदूर यांसारखी शहरे आशयनिर्मिती कलेची मुख्य केंद्रे होऊ लागली आहेत.
भारतातील 110 कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि 70 कोटी समाज माध्यम वापरकर्ते सर्जनशीलतेला चालना देत आहेत. समाज माध्यम मंच आणि ओटीटी सेवा अशा निर्मात्यांना थेट जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाणे शक्य करून देत आहेत. प्रादेशिक पातळीवरील आशय आणि स्थानिक भाषेतील कथन यांच्या उदयाने कथनात आणखी वैविध्य आणले असून त्यायोगे भारताची सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्था खर्या अर्थाने समावेशक झाली आहे. भारताच्या सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर उच्च स्थान प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकार तीन स्तंभांना प्राधान्य देत आहे. प्रतिभासंपन्न युवा वर्गाला प्रोत्साहन, क्रिएटर्स अर्थात सर्जकांसाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि कथाकारांना सक्षम करण्यासाठीची व्यवस्था अधिक सुरळीत करणे. याच दूरदृष्टीचा एक भाग म्हणून केलेली भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेची (आयआयसीटी) स्थापना नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला चालना देणारी आहे. चित्रपट, अॅनिमेशन, गेमिंग किंवा डिजिटल आर्ट यापैकी कोणत्याही क्षेत्रातील भारतीय सर्जकांना देशांतर्गत पातळीवर एकत्र आणणारी सांस्कृतिक शक्ती म्हणून आणि जागतिक मनोरंजनात क्षेत्रात मजबूत ठसा उमटवण्यासाठी पाठबळ देण्याचा आयआयसीटीचा उद्देश आहे. चित्रपट निर्मितीतील अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभव आणि परस्पर संवादी मनोरंजनाला आत्मसात करून भारत, आशयनिर्मितीच्या भविष्याला परिभाषित करण्यासाठी आयआयसीटी सज्ज आहे. सिनेमॅटिक प्रतिभेला अधिक संपन्न करण्याच्या इफ्फीच्या महोत्सवाची वाटचाल सुरू करताना, आपला संदेश स्पष्ट आहे. जागतिक सर्जनशील निर्मितीविषयक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यास भारतीय सर्जक सज्ज आहेत. भौगोलिक अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन भारताची अनोखी ओळख प्रतिबिंबित करताना जागतिक स्तरावर प्रतिध्वनित होणार्या अभिरुचीसंपन्न आणि आशयघन कलाकृती मांडणार्या व्यासपीठाचा लाभ घेणे आणि सातत्याने नवनिर्मिती करणार्यांचे, एकत्रित प्रयत्नांना साथ देणार्यांचे आणि नवोन्मेषाची कास धरणार्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. भारताच्या सर्जनशील निर्मितीविषयक अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी आणि जागतिक नेतृत्वाला चालना देणारी प्रेरणा म्हणून घडवूया. चला एकत्रितपणे कार्य करूया. प्रत्येक भारतीय सर्जक हा जागतिक पातळीवरील उत्कृष्ट कथाकार म्हणून नावारूपाला येईल आणि संपूर्ण जग भारताकडे भविष्याला आकार देणार्या कथांचा देश म्हणून मोठ्या आशेने पाहील याची खात्री करूया.
(लेखक केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत)