Published on
:
23 Nov 2024, 2:08 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:08 pm
इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अतीतटीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केवळ १३ हजार २३ मतांनी विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवला. मात्र आ. जयंत पाटील यांचे घटलेले मतदान त्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी सर्व गटांना सोबत घेवून दिलेली निकराची झुंज त्यांना विजयापर्यंत घेवून गेली नाही.
इस्लामपूर शहराने जयंत पाटील यांना चांगली साथ दिली. मात्र आष्टा शहरासह कृष्णाकाठावर त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तर निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अनेक गावात आघाडी घेतली. मिरज तालुक्यातीलव ८ गावांनी त्यांना अडीच हजारांचे मताधिक्य दिले. जयंत पाटील यांना पोस्टल मतासह 1 लाख 9 हजार 879 तर निशिकांत पाटील यांना 96 हजार 852 मते मिळाली.नोटाला 1 हजार 21 मते मिळाली.166 पोस्टल मते बाद झाली. अन्य उमेदवारांना मिळून 4 हजार 633 मते मिळाली. जयंत पाटील यांना पोस्टल मते 1 हजार 831 तर निशिकांत पाटील यांना 715 मते मिळाली.
सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फे रीत आ.जयंत पाटील यांनी 691 मतांची आघाडी घेतली. 10 व्या फे रीपर्यंत ही आघाडी कायम होती. 11 व्या फे रीत निशिकांत पाटील यांना 467 मतांचे मताधिक्य मिळाले. तोपर्यंत जयंत पाटील यांचे मताधिक्य 12 हजाराच्या पुढे गेले होते. त्यानंतर 13,14 व 17 व्या फेरीत निशिकांत पाटील यांना काहीशी आघाडी मिळाली. इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांना 7 हजारच्या पुढे आघाडी मिळाली तर आष्टा शहरात केवळ 83 मते जादा मिळाली. आष्टा येथून जयंत पाटील यांना मिळालेले हे अल्प मताधिक्य सत्तारुढांना धक्कादायक आहे. इस्लामपूर शहरात निशिकांत पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे ते पिछाडीवर गेले.