एकवीस वर्षांपूर्वी उडुपीतील कार्कळमधील इदु येथे एएनएफने नक्षलवाद्यांवर कारवाई केली होती. 17 नोव्हेंबर रोजी ती कारवाई झाली होती. एका घरावर घातलेल्या छाप्यावेळी कारवाईत कोप्पद पार्वती, रायचुरातील हाजिमा या नक्षलवादी ठार झाल्या होत्या. 21 वर्षे 1 दिवसानंतर पुन्हा एकदा इदुच्या जंगलात गोळीबार झाला.
विक्रम गौडाविरुद्ध शिमोग्यातील आगुंबे आणि तीर्थहळ्ळी येथे तीन गुन्हे दाखल होते. 30 मे 2009 रोजी आगुंबे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील उळमडी गावापासून 3 कि. मी. वरील नेकर्के डोंगरावर मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. बंदी घालण्यात आलेली मावोआदी सिद्धांताबाबतची पुस्तके, 9 एमएमच्या दोन बंदुका, जिलेटिनच्या स्फोटासाठी वापरण्यात येणार्या वस्तू, डिटोनेटर, विविध प्रकारची जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात विक्रम गौडा सहावा संशयित होता.
जुलै 2007 मध्ये तीर्थहळ्ळी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तल्लूरअंगडी येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नक्षलवाद्यांच्या टोळीने अडवली होती. सर्व प्रवाशांना उतरण्यास सांगून बसमधील डिझेल काढून घेतले. त्यानंतर बस पेटवून दिली. काही पत्रके त्यांनी प्रवाशांच्या हातात दिली. ती पत्रके पोलिस आणि सरकारपर्यंत पोचवण्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणातही तो सहावा संशयित होता.
जानेवारी ÷2012 मध्ये विक्रम गौडासह सहाजण चरकन धबधब्यानजीक गेले होते. त्यावेळी एएनएफवर त्यांनी गोळीबार करुन पलायन केले होते. या तीन प्रकरणांत तो हवा होता. याबाबत न्यायालयात सुनावणी बाकी होती.