Published on
:
19 Nov 2024, 2:41 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:41 pm
नागपूर : गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. मंगळवारचा दिवस बूथ पातळीवर नियोजनात उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, निवडणूक प्रमुखांनी घालविला. राजकीय पक्षांमार्फत पुरेशी खबरदारी घेत नव्या चेहऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली. बुधवारी सकाळी मतदान सुरू होईल त्यावेळी या सर्वांची कसोटी लागणार आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिकाधिक मतदानाचा टक्का कसा आपल्या बाजूने वळेल यासाठी प्रत्येक जण कामाला लागला आहे.
काटोल येथील घटनेनंतर जिल्ह्यात सावनेर, रामटेक, उमरेड, हिंगणा अशा विविध मतदारसंघात प्रशासन व पोलिस यंत्रणा अधिक अलर्ट मोडवर आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात ग्रामीणमध्ये दोन हजार पोलिसांची मदत ग्रामीणमध्ये घेतली जात आहे. शहरात पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात यंत्रणा कामाला लागली आहे. आज दुपारनंतर पोलिंग पार्टी आपापल्या कर्तव्यावर रवाना झाल्या. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र जवळपास आता स्पष्ट झाले आहे. काही जागी थेट तर काही जागी मत विभाजनावर विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून राहणार आहे. मध्य नागपुरात हलबा समाजाच्या हाती भाजप काँग्रेसची मदार आहे. आज रात्रभर प्रमुख उमेदवार त्यांचे पदाधिकारी जागते रहो.. ! भूमिकेतून कामाला लागणार असल्याने प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.