महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐतिहासिक हाराकिरी झाली. त्यावरून आता किरकिरी पण सुरू झाली आहे. महायुती, भाजपाची त्सुनामी आली आहे. या भगव्या लाटेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महायुती दिमाखात सत्तेत परत येत आहे. पण . या निवडणुकीत सर्वात मोठा फटका ठाकरे कुटुंबाला बसला आहे. मनसेला दणका बसला तर ठाकरे गटाला 25 जागा मिळताना दिसत आहेत. त्यावरून आता ‘एक थे तो सेफ थे’ असा नारा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी चर्चा रंगली आहे. मुंबईसह मराठी मतदारांनी मध्यंतरी राज-उद्धव ठाकरे यांच्या एकीसाठी आंदोलन केले होते. आता पुन्हा दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची आरोळी ठोकण्यात आली आहे. वेगवेगळे लढून संपण्यापेक्षा एकत्र येऊन मराठी माणसांसाठी लढा अशी भावनिक साद घालण्यात येत आहे.
सध्याची स्थिती काय?
सध्या राज्यातील निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्का बसला आहे. महायुतीने जी त्सुनामी आणली आहे, त्याच्यावर काथ्याकूट सुरू आहे. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुती 214 जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा 123 जागांवर सर्वात आघाडीवर आहे. तर त्यापाठोपाठ शिंदेंची शिवसेना 49 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी 38 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 69 जागांच्या पुढे मजल मारता आलेली नाही. त्यात काँग्रेस 23, उद्धव ठाकरे गटाला 24 तर शरद पवार गटाला 17 जागांवर मतं मिळाली आहेत.
हे सुद्धा वाचा
मनसेचे खाते उघडणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमच्या पाठिंब्यावर भाजपा यंदा सरकार बनवणार असे जाहीर केले होते. तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. पण यावेळी राज ठाकरे यांच्या पक्षाला खाते तरी उघडता येईल की नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचा माहिमच्या मतदारसंघात पराभव झाला आहे. तर गेल्यावेळी निवडून आलेल्या आमदारासमोर सुद्धा मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये मनसेची स्थापना केली. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना 13 जागांवर घवघवीत यश मिळाले. पण पुढे पक्षाची घसरण होत गेली. 2014 मध्ये दोन तर 2019 मध्ये त्यांच्या पक्षाचा केवळ एक आमदार निवडून आला.
तर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पण मोठी पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्या मार्गावर तर जात नाहीत ना? अशी चर्चा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेची कामगिरी सातत्याने एक कदम पीछे अशी सुरू आहे. त्यावरून आता ठाकरे गट सुद्धा मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाकडे 16 आमदार उरले होते. आताच्या कलानुसार त्यांचे 24 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत.